राष्ट्रवादीला बंडखोरीची डोकेदुखी
By admin | Published: February 14, 2017 02:08 AM2017-02-14T02:08:39+5:302017-02-14T02:08:39+5:30
मावळ पंचायत समितीच्या दहा व पुणे जिल्हा परिषदेच्या पाच जागांवरील उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सोमवारी शेवटच्या
लोणावळा : मावळ पंचायत समितीच्या दहा व पुणे जिल्हा परिषदेच्या पाच जागांवरील उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सोमवारी शेवटच्या क्षणापर्यत मनधारणी करुनही सर्वसाधारण जागांवरील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने बंडखोरी रोखण्यात मावळात राष्ट्रवादीला अपयश आले. भाजपाला मात्र बंडखोरी रोखण्यात यश आले आहे.
राष्ट्रवादीच्या बंडखोरांना अद्दल घडविण्यासाठी त्यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात प्रचार करणाऱ्यांची २१ तारखेनंतर हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष गणेश ढोरे यांनी जाहीर केले. निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना डावलून घराणेशाहीचा कित्ता गिरवत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ढोरे, जिल्हा बॅकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे व इतर नेते यांनी नातेवाईकांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीतील बंडखोरांना एकत्र घेत समांतर राष्ट्रवादी पक्षांच्या माध्यमातून तिसरी आघाडी स्थापन करत राष्ट्रवादीला शून्यावर आऊट करण्याचा मानस राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांनी व्यक्त केला आहे.
भाजपा मात्र बंडखोरांना रोखण्यात यशस्वी झाली असून आमदार बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत सर्व बंडखोरांनी माघार घेतली. शिवसेनेने ऐनवेळी पक्षांचे वडगाव खडकाळा येथिल
अधिकृत उमेदवार अनिकेत घुले यांची उमेदवारी माघारी घेत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार बाबूराव
वायकर यांना पुरस्कृत केले
असल्याचे जाहिर केले. मात्र, वायकर यांनी मला शिवसेनेकडून याबाबत अधिकृतपणे काहीही कळविले नसल्याचे सांगितल्याने शिवसेनेची गोची झाली आहे.(वार्ताहर)