राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व
By Admin | Published: February 24, 2017 02:41 AM2017-02-24T02:41:32+5:302017-02-24T02:41:32+5:30
लोणावळा शहरालगतच्या नाणे मावळातील कुसगाव वाकसई जिल्हा परिषद गट व पंचायत
लोणावळा : लोणावळा शहरालगतच्या नाणे मावळातील कुसगाव वाकसई जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या कुसगाव व वाकसई गणातील तिन्ही जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.
मावळ पंचायत समितीचा वाकसई गण हा अनुसूचित जमातीकरिता राखीव झाला होता. या ठिकाणी राष्ट्रवादीचे महादू हरी उघडे, भाजपाचे संदीप उंबरे व शिवसेनेचे बाबू शेळके यांच्यात ही लढत झाली. मागील पंचवार्षिक काळात ही जागा शिवसेनेच्या ताब्यात असल्याने ती टिकविण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली होती. या जागेवर विजय मिळविण्यासाठी राष्ट्रवादी व भाजपाने जोर लावला होता. अखेर राष्ट्रवादीच्या उघडे यांनी ४५६३ मते मिळवत शिवसेनेचे शेळके यांचा ७१० मतांनी पराभव केला. शेळके यांना ३८५३, तर भाजपाचे संदीप उंबरे यांना ३५७४ मते मिळाली.
कुसगाव गणात देखील मागील पंचवार्षिक काळात राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार हरीश कोकरे विजयी झाले होते. हा गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव होता. राष्ट्रवादीच्या राजश्री संतोष राऊत यांनी ३५२६ मते मिळवत प्रतिस्पर्धी भाजपाच्या संगीता अनंता गाडे यांचा ७१४ मतांनी पराभव केला. गाडे यांना २८१२ मते मिळाली, तर शिवसेनेच्या उषा संजय घोंगे यांना तिसऱ्या क्रमांकाची २८०५ व नवबहुजन समाज परिवर्तन पार्टीच्या रचना सुरेश घोमोड यांना १७४ मते मिळाली.
कुसगाव वाकसई गट दहा वर्षांपासून राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर येथील जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय गुंड यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मात्र येथेसुद्धा सलग तिसऱ्यांदा राष्ट्रवादीने बाजी मारत शिवसेनेच्या उमेदवार सत्यभामा शांताराम गाडे यांचा १२२४ मतांनी पराभव करत राष्ट्रवादीच्या कुसुम ज्ञानेश्वर काशिकर यांनी विजय मिळविला. काशिकर यांच्या रूपाने वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये प्रथम जिल्हा परिषदेचे सदस्यत्व मिळाले. काशिकर यांना प्रथम क्रमांकाची ८००३ मते मिळाली, तर गाडे यांना ६७७९ मते मिळाली. भाजपाच्या अनिता दिलीप कडू यांना ६४२० मते मिळाली.
राष्ट्रवादीने या गट व गणात तिन्ही जागा जिंकत बाजी मारल्यानंतर सर्व विजयी उमेदवारांची रॅली मतदारसंघात काढण्यात आली होती. स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस दीपक हुलावळे, राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष अमोल केदारी, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, नाणे मावळचे कार्याध्यक्ष राजू देवकर आदी त्यात सहभागी झाले होते. (वार्ताहर)