'वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नागरिकांचेही प्रयत्न आवश्यक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:18 PM2018-08-27T23:18:33+5:302018-08-27T23:19:15+5:30

तेजस्वी सातपुते : नियमांचे पालन केले, तरी वाहतूक सुरळीत होईल

Need of citizens 'effort to break traffic jams' | 'वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नागरिकांचेही प्रयत्न आवश्यक'

'वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नागरिकांचेही प्रयत्न आवश्यक'

googlenewsNext

पिंपरी - लेन कटिंग, एकेरी वाहतूक असलेल्या मार्गांवर घुसखोरी करून अनेक जण स्वत:चा वेळ वाचविण्याचा प्रयत्न करतात. संबंधित ठिकाणी वाहतूककोंडी करण्याचा त्यांचा उद्देश नसतो; पण लवकर पोहोचण्याच्या नादात वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते. त्याचा इतरांना त्रास होतो. अंतर वाढले तरी चालेल; पण ‘एकेरी मार्गाने जाणार नाही, लेन कटिंग करणार नाही,’ अशी भूमिका वाहनचालकांनी घेतली, तर कोंडी होणार नाही. किती वाहने जाऊ शकतात, याबाबत प्रत्येक रस्त्याची एक क्षमता असते. त्यापेक्षा अधिक गाड्या रस्त्यावर आल्या, की वाहतूक मंदावते.

पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडतात. त्यांची चांगल्या प्रकारे डागडुजी न केल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे इतर वेळी त्या ठिकाणाहून जाणारे वाहन रस्त्याच्या मधोमध चालवले जाते. त्यामुळे खूप चांगल्या रस्त्यावरदेखील काही मीटर खड्डे असतील, तर कोंडी होते. हे सर्व टाळण्यासाठी खड्डे बुजवून रस्ते चांगले ठेवणे गरजेचे आहे. त्याबाबत पोलीस आणि प्रशासनाकडून पाठपुरावा आवश्यक आहे. नागरिकांनी या समस्या आमच्या लक्षात आणून द्याव्यात. पावसाचे पाणी गेल्याने अनेक ठिकाणी सिग्नल बंद पडतात. ते बंद पडू नयेत, याबाबत चर्चा करण्यात आली आहे. एकाच मार्गावरील दोन सिग्नल सुरू नसतील, तर मागील सिग्नलवरून व्यवस्थित निघालेली वाहतूक पुढच्या सिग्नलला अडकते. बंद पडलेले सिग्नल लगेच दुरुस्त झाले पाहिजेत. स्मार्ट सिटीमध्ये सर्वच सिग्नल नवीन येणार आहेत. त्यामुळे सध्या ते नवीन
घेणे मान्य होण्यासारखे नाही. आपल्याकडे वाहतुकीच्या अनेक समस्या आहेत; त्यामुळे बदल हा हळुवार होणार आहे.
पीएमपी बस बंद पडल्यानेदेखील कोंडी होते. त्याबाबत पीएमपीच्या प्रशासनाशी चर्चा करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांना सूचना दिल्या आहे, की बस डावीकडच्या लेनमधूनच चालवा. त्यामुळे बस बंद जरी पडली, तरी सर्व रस्ता जाम होणार नाही. त्यांना ही बाब पटली असून, त्यांची अंमलबजावणी सुरू होईल. नवीन गाड्या खरेदीबाबतदेखील चर्चा करण्यात आली.
शहरातील सर्वच रस्ते एकाच आकाराचे नाहीत. एकच रस्ता वेगवेगळ्या ठिकाणी छोटा-मोठा असतो. त्यामुळे त्या रस्त्याची क्षमता किती आहे, याचा विचार करून त्यावरून वाहने जाणे गरजेचे आहे. नो पार्किंगमध्ये वाहने लावण्याने रस्त्याची वहनक्षमता कमी होते. नो पार्किंग झोन करूनदेखील त्या ठिकाणी दुचाकींची रांग लागते.

शहरातील विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या ३०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधूनदेखील वाहतूक नियमन केले जात आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांना या माध्यमातून दंड करण्यात येत आहे. धाक दाखविण्यापेक्षा जनजागृती केली, तर प्रश्न लवकर सुटतो. वाहतूक पोलीस ड्युटी म्हणून पावसात उभे असतात. मात्र, त्याच वेळी वाहनचालकदेखील कोंडीत अडकतो.
देशात सर्वच ठिकाणच्या सरकारी विभागांत मनुष्यबळाचा आभाव आहे. मात्र नागरिक, प्रशासन आणि पोलीस अशा तिघांनी मिळून एखादे काम हाती घेतले, तर ते नक्कीच पूर्ण होऊ शकते.

शहरातील वाहनांचा स्पीड खूपच कमी असल्याचे कारण देत हेल्मेटसक्ती नाकारण्यात आली आहे. त्यामुळे शहराचा स्पीड वाढविण्यावर भर देण्यात येईल. कोंडी होणे ही वाहतूक पोलिसांची इमर्जन्सी आहे. त्यामुळे कोंडी झाल्याचे समजताच वरिष्ठाने तेथे जाणे अपेक्षित आहे. आपल्या चुकीमुळे कोंडी होणार नाही, याची काळजी पोलिसांनी घ्यावी. शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पोलीस, प्रशासनासह नागरिकांनाही प्रयत्न करावे लागणार आहेत. रस्त्यावर असताना केवळ स्वत:चा विचार करून वाहन चालवू नये. वाहतूककोंडी हा कोणाएका विभागाचा प्रश्न नाही. प्रत्येकाने तो आपल्या जिव्हाळ्याचा मुद्दा करावा. इच्छित ठिकाणी जाण्यास उशीर झाला तरी चालेल; पण वाहतुकीचे नियम तोडणार नाही, अशी भूमिका प्रत्येक वाहनचालकाने घेतली तर कोंडी कमी होईल, असा विश्वास वाहतूक विभागाच्या उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

Web Title: Need of citizens 'effort to break traffic jams'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.