गुणीजणांचा गौरव आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 01:25 AM2018-08-30T01:25:04+5:302018-08-30T01:25:46+5:30
सुभाष देसाई : उद्धवश्री पुरस्कारांचे भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात वितरण
पिंपरी : समाजातील प्रत्येक गुणवंतांचा गौरव करण्याची आवश्यकता आहे. शिवसेना प्रमुखांनी गुणीजणांच्या पाठीवर थाप दिली. गुणीजण आपल्या विचारांचा, आपला पाठीराखा आहे का? याचा कधीच विचार केला नाही. अन्याय करणा-यावर आसूड ओढलेच, तसे समाजासाठी चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली, असे मत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भोसरी येथे व्यक्त केले.
भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात उद्धवश्री पुरस्काराचे वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते.
शिवसेना उपनेते डॉ. रघुनाथ कुचिक, राज्य संघटक गोविंद घोळवे, संपर्कप्रमुख बाळा कदम, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला आघाडी शहर संघटक सुलभा उबाळे, नगरसेवक प्रमोद कुटे, उर्मिला काळभोर, समितीचे निमंत्रक, कामगार नेते इरफान सय्यद, अध्यक्ष माधव मुळे, सचिव गुलाब गरूड, अमित धुमाळ, भुषण कडू, पुजा माळेकर आदी उपस्थित होते.
देसाई म्हणाले, ‘‘समाजातील प्रत्येक स्तरावरच्या व्यक्तीच्या कार्यावर लक्ष ठेवून त्याचा गौरव केला. कवी कुसुमाग्रज यांचा जसा नाशिकला त्यांच्या घरी जावून सन्मान केला, तसा कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा गौरव शिवसेनेच्या अधिवेशनात केला. शिवसेनेला कोणती व्यक्ती बाधक होईल, याची तमा त्यांनी कधीच बाळगली नाही.’’
बारणे म्हणाले,‘‘राजकारण बाजूला ठेवून समाजातील सर्वसामान्य माणसांचे अश्रू पुसण्याचे उद्धव ठाकरे यांनी काम केले. त्यांच्या रुपाने स्पष्ट भूमिका मांडणारे आणि परखड विचार ठेवणारे नेतृत्व शिवसेनेला लाभलेले आहे, ’’
शिवसेना प्रमुखांनी स्वबळावर निवडणुकीचा नारा दिला आहे. शिवसेनेची सत्ता येण्यासाठी सर्वांनी गट तट विसरून एकदिलाने काम करावे. भविष्यात पिंपरी-चिंचवड व मावळ भागातून दोन खासदार आणि तीन आमदार हे शिवसेनेचे असतील, असा विश्वास गोविंद घोळवे यांनी व्यक्त केला.
सोहळा : मान्यवरांचा सन्मान
क्रीडा क्षेत्रातील बाळासाहेब लांडगे, ज्येष्ठ साहित्यिक राजन खान, अर्जून पुरस्कार विजेते मुष्टीयोद्धा गोपाळ देवांग, सरहद्दचे संजय नहार, एम. एम. हुसेन, उद्योजिका दिप्ती चंद्रचूड, दिग्दर्शक भाऊसाहेब कठहाडे, पत्रकार कैलास पुरी, सामाजिक कार्यकर्ते बाबा कांबळे, छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर, कामगार नेते किशोर ढोकळे, डॉ. पंकज बोहरा, साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक गोविंद दाभाडे, सनदी लेखापाल डी. एम. खुणे, भूषण तोष्णिवाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.