अंधारात चाचपडणाऱ्यांना माणुसकीच्या उजेडाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 04:08 AM2018-04-29T04:08:32+5:302018-04-29T04:08:32+5:30

एका अंध जोडप्याने आधारासाठी लग्नगाठ बांधली. सुखाचा संसार सुरू झाला. मात्र नियतीची दृष्ट लागली. कुकरचे झाकण उडून झालेल्या अपघातात ती गंभीर भाजली

The need for light of humanity in the dark | अंधारात चाचपडणाऱ्यांना माणुसकीच्या उजेडाची गरज

अंधारात चाचपडणाऱ्यांना माणुसकीच्या उजेडाची गरज

Next

चिंचवड : एका अंध जोडप्याने आधारासाठी लग्नगाठ बांधली. सुखाचा संसार सुरू झाला. मात्र नियतीची दृष्ट लागली. कुकरचे झाकण उडून झालेल्या अपघातात ती गंभीर भाजली. तिच्या मदतीसाठी चिक्की विक्रीची व्यवसाय सोडून त्यालाही घरी बसावे लागले. चिक्की विक्री हा एकमेव आधार असलेल्या या अंध दाम्पत्याला आता हाता-तोंडाची मिळवणी करणे अवघड झाले आहे. दृष्टी अधू असतानाच दैवही परीक्षा घेत असल्याने या दाम्पत्याचे भवितव्य काळोखात बुडाले आहे. त्यांना मदतीचा हातभार लावण्यासाठी समाजाने पुढे येण्याची आवश्यकता आहे.
निगडीतील आझाद चौकात भाड्याच्या खोलीत कांतीलाल व रुपाली पावरा या अंध दाम्पत्याने संसार थाटला आहे. डोळ्यात काळाकुट्ट अंधार असला, तरीही रुपाली उत्तम स्वयंपाक करते. नेहमीप्रमाणे ती सायंकाळी स्वयंपाक करत होती. भात शिजायला लावला तेव्हा कुकरच्या झाकणाचा अंदाज तिला आला नाही. कुकरमधील वाफ अंगावर आल्याने रुपाली या घटनेत जखमी झाली. तिच्या अंगाचा वेध या वाफेने घेतला आणि रुपाली जखमी झाली. कांतीलाल रेल्वेत चिक्की विक्रीचा व्यवसाय करतो. घरी आल्यावर त्याला ही घटना समजली. रुपालीवर निगडीतील खासगी डॉक्टरांकडे उपचार घेण्यात आले. मात्र अजूनही तिच्या वेदना कमी होत नाहीत. तिला गरज आहे रुग्णालयातील उपचारांची.
या घटनेमुळे पावरा दाम्पत्य चिंतेत आहे. रुपाली जखमी झाल्याने कांतीलालचा चिक्की विक्रीचा व्यवसाय सध्या बंद आहे. घरभाडे, लाईटबिल थकले आहे.

कामाचा सोशल मीडियावर गवगवा
पावरा परिवाराला मदत करण्यासाठी शहरातील एका सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला. महिन्याभरापूर्वी त्यांना मदत करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते, पदाधिकारी पुढे आले. दहा हजार रुपयांचा धनादेश, किराणा माल देण्यात आला. कांतीलालसाठी कंपनीत काम देणार असल्याचे जाहीर केले. त्याचे फोटोसेशनही झाले. संस्थेच्या वतीने सोशल मीडियावर केलेल्या कामाचा गवगवा करत पाठ थोपटून घेतली. समाजातील वंचित घटकाला मदत केल्याची बातमी सर्वत्र पसरविली. मात्र, दोन दिवसांनंतर कांतीलालला फोन करून धनादेश भरू नका, आम्ही पैसे रोख देतो, असे सांगण्यात आले; मात्र या संस्थेचे कोणीही पैसे देण्यासाठी आले नाही. फोन करून संपर्क साधला असता, आम्ही दोन दिवसांत येणार असल्याचे सांगितले जात आहे. रुपालीच्या उपचारासाठी पैसे मिळतील या आशेने तो रोज त्यांची वाट पाहत आहे. मात्र, आता आमची फसवणूक झाली आहे, अशी भावना दाम्पत्य व्यक्त करीत आहे.

Web Title: The need for light of humanity in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.