नीलम गो-हे-श्रीरंग बारणे यांची पक्षप्रमुखांसमोरच वादावादी , लक्ष्मण जगतापांच्या भेटीचे पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:24 AM2017-09-19T00:24:10+5:302017-09-19T00:24:13+5:30
शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गो-हे व मावळचे खासदार श्रीरंग बारणे या दोन नेत्यांमध्ये पक्षप्रमुखांसमोरच मुंबईतील मातोश्री येथील बैठकीत वादावादी झाली. आमदार लक्ष्मण जगताप यांना शिवसेनेत आणण्याच्या आक्षेपावरून वादंग झाल्याचे विश्वसनीयरीत्या समजते.
पिंपरी : शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गो-हे व मावळचे खासदार श्रीरंग बारणे या दोन नेत्यांमध्ये पक्षप्रमुखांसमोरच मुंबईतील मातोश्री येथील बैठकीत वादावादी झाली. आमदार लक्ष्मण जगताप यांना शिवसेनेत आणण्याच्या आक्षेपावरून वादंग झाल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. गो-हे आणि जगताप यांच्यातील भेटीचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. तेच वादाचे कारण असल्याची चर्चा आहे.
मुंबईत आज ‘मातोश्री’ बंगल्यावर शिवसेनेचे मंत्री, खासदार आणि आमदारांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक होती. त्या बैठकीत पक्षप्रमुखांसमोरच दोनदा आमदार, मंत्री आणि खासदार यांच्यामध्ये खडाजंगी झाली. रायगडमधील आमदार भरत गोगावले आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यात पहिला, तर दुसरा वाद गोºहे आणि बारणे यांच्यात झाली.
खडाजंगीचे कारण होते शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोºहे यांची भाजपाचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने नुकतीच घेतलेली भेट. दरम्यान, गोºहे आणि बारणे यांच्यातील वाद हा विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच आहे. पक्षाच्या आदेशानुसार भाजपात दाखल होण्यापूर्वीही जगताप यांना शिवसेनेत आणण्याचे प्रयत्न गोºहे यांनी केले होते. बैठकाही झाल्या होत्या. मात्र, जगताप यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश केला.
>श्रीरंग बारणे यांच्या आक्षेपावर नीलम गो-हे म्हणाल्या, ‘माझी निष्ठा काय आहे, हे पक्षप्रमुखांना माहीत आहे. मला माझी निष्ठा कोणाला सांगायची गरज नाही.’ हे सांगताना गो-हे यांना आश्रू अवरता आले नाही. त्यातून दोन नेत्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. मात्र, खासदार श्रीरंग बारणे यांनी, असे काही घडलेच नाही, असे सांगून प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. तसेच, गो-हे यांनीही पक्षाअंतर्गत बैठकीतील चर्चेविषयी बोलण्यास नकार दिला.