नागरिकांच्या आरोग्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, कचराकुंड्या ही शहरातील मुख्य समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 01:56 AM2017-11-12T01:56:43+5:302017-11-12T01:56:50+5:30
महापालिकेच्या नियोजनशून्य कामामुळे ओसंडून वाहणा-या कचराकुंड्या ही शहरातील मुख्य समस्या झाली आहे. याच बेजबाबदार नियोजनामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून, या कचराकुंड्यामधून अनेकांनी आरोग्य धोक्यात घालून पोटाची खळगी भरण्याचा मार्ग निवडला आहे.
चिंचवड : महापालिकेच्या नियोजनशून्य कामामुळे ओसंडून वाहणा-या कचराकुंड्या ही शहरातील मुख्य समस्या झाली आहे. याच बेजबाबदार नियोजनामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून, या कचराकुंड्यामधून अनेकांनी आरोग्य धोक्यात घालून पोटाची खळगी भरण्याचा मार्ग निवडला आहे.
शहरात भरभरून वाहणा-या कचराकुंड्यांचे वास्तव समोर येत आहे. याच कुंड्या अनेकांचा आधार ठरत आहे. बहुतांश मुले व महिला अशा ठिकाणी कचरा वेचताना दिसत आहेत. ना दप्तराचे ओझे ना शाळेचा गंध, मळकटलेले कपडे आणि भिरभिरती नजर या अवस्थेत अनेक लहान मुले अशा कचराकुंड्यांतून उपजीविका भागवीत आहेत.
अनेक महिलाही या कामात व्यस्त आहेत. कचरा गोळा करण्यासाठी कोणतीही सुरक्षिततेची साधने नसतानाही अनेक कर्मचारी आरोग्याचा धोका पत्करून ही कामे करीत आहेत. विविध भागातील कचरा गोळा करून एका ठरावीक जागेवर टाकला जातो. या ठिकाणी अनेक महिला हा कचरा वेचण्याचे काम करतात. यातून मिळणारे भंगार, प्लॅस्टिक व अन्य वस्तू निवडण्याचे काम सुरू असते. अशा ठिकाणी घाणीचे साम्राज्य व दुर्गंधी असूनही जीव धोक्यात घालून ही मंडळी कामात व्यस्त असतात.
शहरातील डेंगी, स्वाइन फ्लू अशा धोकादायक आजारांचे थैमान सुरू असताना कचरा वेचणाºया घटकाला मात्र आपल्या जिवाची काळजी वाटत नाही. पालिका प्रशासनाचे अशा घटनांकडे दुर्लक्ष झाल्याने परिस्थिती धोकादायक आहे.