कंत्राटदाराचा निष्काळजीपणा बेतला चिमुकलीच्या जिवावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 04:46 PM2019-02-24T16:46:56+5:302019-02-24T16:47:52+5:30
कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे.
पिंपरी : मुंबई बंगळुरू महामार्गावर पाषाण तलावासमोर रस्ते दुरूस्तीचे काम सुरू आहे, कंत्राटदाराने दिशादर्शक फलक लावुन सुरक्षिततेची दक्षता न घेतल्याने एक मोटार खोदाई केलेल्या खड्यात पलटी झाली. त्यात ९ जण जखमी झाले. तर चार वर्षाची चिमुकली गंभीर जखमी झाल्याने मृत्यूमुखी पडली. ही घटना शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. कंत्राटदाराविरूद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुतारवाडी पाषाण येथून जात असताना, रत्यासाठी खोदाई केलेल्या खड्यालगतच्या ढिगाऱ्याला धडकून फिर्यादी अमोल रावसाहेब पवार (वय २५) यांची मोटार पलटी झाली. सुतारवाडी पाषाण येथे हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. या अपघातात उदय चव्हाण (वय ४०,वडगाव बुद्रुक), नम्रता चव्हाण (वय ३५), स्वराली चव्हाण (वय ७), सोनाली काळे (वय ३१), विनोद काळे (वय ३४), वेदांत काळे (वय ४), खंडू भरत सपाअे (वय २०), प्रमोद पवार (वय २७), पूजा पवार (वय २५) हे जखमी झाले आहेत. तर श्रद्धा उदय चव्हाण ही चार वर्षाची बालिका या अपघातात ठार झाली. तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपीविरोधात फिर्याद दाखल झाली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.