दोन्ही महापालिकांचे दुर्लक्ष; सांडपाणी थेट नदीत, पवना-इंद्रायणी पाठोपाठ मुळाही फेसाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:40 IST2025-03-20T13:38:41+5:302025-03-20T13:40:59+5:30
अनेक कंपन्यांचे दूषित पाणी कोणतेही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडतात, त्यामुळे होणाऱ्या नदी प्रदूषणाकडे पुणे आणि पिंपरी महापालिकेचे दुर्लक्ष होतंय

दोन्ही महापालिकांचे दुर्लक्ष; सांडपाणी थेट नदीत, पवना-इंद्रायणी पाठोपाठ मुळाही फेसाळली
पिंपरी : पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराच्या सीमेवर असणाऱ्या मुळा नदीची अवस्था गटारगंगेची झाली आहे. दोन्ही महापालिकांच्या दुर्लक्षामुळे सांडपाणी थेट नदीमध्ये सोडले जात आहे. रसायनयुक्त पाण्यामुळे बुधवारी नदी फेसाळली होती.
पिंपरी- चिंचवड शहरातून इंद्रायणी, पवना आणि मुळा अशा तीन नद्या वाहतात. मुळा नदी पिंपरी-चिंचवड व पुणे शहराच्या सीमेवरून वाहते. वाकड ते दापोडी असे नदीचे पात्र शहराच्या सीमेवर आहे. या नदीच्या अलीकडे पिंपरी-चिंचवड शहर असून, त्यावर हिंजवडी, वाकड, पिंपळे निलख, सांगवी, नवी सांगवी, दापोडी, बोपखेल परिसर आहे. पुण्याच्या बाजूने बालेवाडी स्टेडियम, बालेवाडी गावठाण, बाणेर, औंध, बोपोडी, दापोडी असा परिसर आहे. या परिसरातील सांडपाणी मोठ्या प्रमाणावर नदीत सोडले जात आहे.
पाण्याचे नमुने तपासणीसाठी
रसायनयुक्त पाणी, तसेच मैला सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने, बुधवारी सकाळपासूनच नदी फेसाळली होती. दुर्गंधी येत होती. या संदर्भातील छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, त्याची दखल पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे. पाण्याचे नमुने घेतले आहेत.
पिंपळे-निलख येथून वाहत असलेल्या मुळा नदी प्रवाहात मोठ्या प्रमाणात फेस आढळून आला. अनेक कंपन्यांचे दूषित पाणी कोणतेही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडतात. नदी प्रदूषणाकडे पुणे आणि पिंपरी महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. - रविराज काळे, युवा आघाडी, आम आदमी पार्टी.
वाकड ते पिंपळे निलख परिसरामध्ये अनेक ठिकाणाहून सांडपाणी नदीमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे नदीवर फेस आला आहे. अनेक जलचर प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली ठेकेदार पोसण्याचे काम सुरू आहे. नदी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करायला हवी. - तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट.