निशांतच्या अवयवदानातून नवे आयुष्य

By admin | Published: March 10, 2017 05:01 AM2017-03-10T05:01:09+5:302017-03-10T05:01:09+5:30

एकुलत्या एक मुलाच्या अवयवदानातून आणि आई-वडिलांच्या पुढाकारामुळे तीन जणांच्या आयुष्याला संजीवनी मिळाली. खामगाव येथील निशांत बोबडे या २१ वर्षीय

New Life from Nishant's organs | निशांतच्या अवयवदानातून नवे आयुष्य

निशांतच्या अवयवदानातून नवे आयुष्य

Next

पुणे/पिंपरी : एकुलत्या एक मुलाच्या अवयवदानातून आणि आई-वडिलांच्या पुढाकारामुळे तीन जणांच्या आयुष्याला संजीवनी मिळाली. खामगाव येथील निशांत बोबडे या २१ वर्षीय युवकाचा पुण्यात अपघाती मृत्यू झाला. या दुर्दैवी प्रसंगातून सावरत बोबडे कुटुंबीयांनी निशांतच्या अवयवदानाचा निर्णय घेतला.
निशांत नितीन बोबडे याला २१ फेब्रुवारी रोजी अपघात झाला होता. उपचारांसाठी निशांतला प्रथम मेडिपॉर्इंट हॉस्पिटल व नंतर डेक्कन जिमखाना येथील सह्याद्री स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये हलविले; परंतु, त्याने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. हॉस्पिटलकडून त्याला ‘ब्रेनडेड’ घोषित केले. या दुर्दैवी प्रसंगाला धैर्याने सामोरे जात निशांतच्या आई-वडिलांनी त्याच्या देहदानाची तयारी दर्शवली. निशांतचे हृदय, किडनी, यकृत, डोळे व त्वचा दान करण्यात आली असून, त्याच्या हृदयाचे प्रत्यारोपण हृदयविकाराने पीडित एका २९ वर्षीय रुग्णाच्या शरीरात केले. हा रुग्ण मुंबईमधील कोकीळाबेन अंबानी रुग्णालयात दाखल झाला होता. सह्याद्री हॉस्पिटल ते पुणे विमानतळ या मार्गावरील संपूर्ण वाहतूक थांबवून निशांतचे हृदय ग्रीन कॉरिडॉरने तातडीने अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे मेडिकल प्रीझर्व्हेशन सोल्युशन बॉक्समधून २० मिनिटांत लोहगाव विमानतळावर पोहोचविले. तेथून ते विमानाने कोकीळाबेन हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे तातडीने शस्त्रक्रिया करून प्रत्यारोपण केले. त्यामुळे एका २९ वर्षीय तरुणाला जीवदान मिळाले.
निशांतच्या यकृताचे प्रत्यारोपण ४६ वर्षीय इसमाच्या शरीरात करण्यात आले असून, सह्याद्री येथील ६१ वर्षीय वृद्ध व्यक्तीला एक किडनी तर जहांगीर हॉस्पिटलमधील २९ वर्षीय तरुणाच्या शरीरात एका किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले. निशांतच्या आई संगीता ऊर्फ नेहा बोबडे यांचीही देहदानाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका होती. या दुर्दैवी प्रसंगातही त्यांनी देहदानाच्या निर्णयावर होकार दर्शवला. निशांतच्या आई-वडिलांनी घेतलेल्या देहदानाच्या निर्णयामुळे चार जणांना जीवदान मिळाले. एकुलता मुलगा गमावला असतानादेखील या कटू प्रसंगात सामाजिक बांधिलकीचे भान राखत बोबडे कुटुंबाने घेतलेला धाडसी निर्णय समाजासाठी प्रेरणादायी आहे. (प्रतिनिधी)

निशांतच्या आई-वडिलांनी उदार भावनेतून घेतलेल्या देहदानाच्या निर्णयामुळे
तिघांना जीवदान मिळाले आहे. बोबडे कुटुंबीयांनी मनावर दगड ठेवून घेतलेला निर्णय समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी असेल. वाहतूक पोलिसांनी देखील ग्रीनकॉरिडोअर करून मदत केली
- केतन आपटे,
विभाग प्रमुख, सह्याद्री हॉस्पिटल

निशांत बोबडे याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी हृदय, यकृत, किडन्या आणि त्वचादानाचा निर्णय घेतला. हृदय ग्रीन कॉरिडॉरने मुंबईला पाठवण्यात आले. यकृत आणि एक किडनी सह्याद्री हॉस्पिटलमधील प्रत्येकी एका रुग्णाला देण्यात आली आहे. जहांगीरमधील एका रुग्णाच्या शरीरात दुसऱ्या किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले. त्वचेचे जतन करुन ठेवण्यात आले आहे.
- आरती गोखले, झेडटीसीसी

तरुण मुलाचा अपघाती मृत्यू ही बाब मनाला चटका लावून जाणारी होती. या घटनेने आमच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. अवयवदानाबाबत सुरुवातीपासूनच माहिती होती. आपला मुलगा गेल्याचे दु:ख बाजूला ठेवून इतरांना जीवदान देण्याच्या उद्देशाने अवयवदानाचा निर्णय घेतला. अवयवदानामुळे रुग्णांचा पुनर्जन्म झालाच; पण, आमचा मुलगाही अमर झाला. त्याच्या अवयवांच्या रुपात तो कायम जिवंत राहील. आपल्या घरात अंधार झाला असला तरी इतरांचे घर उजळणार आहे, याचेच समाधान वाटत आहे. मुलगा गेल्याचे दु:ख आयुष्यभर राहणारच आहे. प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर कोणत्या ना कोणत्या कारणाने दु:खी असतेच. मात्र, दु:ख बाजूला सारुन धाडसी निर्णय घेतला.
- नेहा बोबडे, निशांतची आई

Web Title: New Life from Nishant's organs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.