पिंपरी महापालिकेच्या शिक्षण समितीवर नवीन सदस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 04:45 PM2019-07-25T16:45:16+5:302019-07-25T16:47:32+5:30
महापालिकेतील पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका अशा नऊ सदस्यांची निवड केली आहे.
पिंपरी - महापालिकेच्या शिक्षण समिती नवीन नऊ सदस्यांची निवड करण्यात आली आहे. पक्षीय बलाबलानुसार सदस्यांची निवड केली असून भाजपच्या चंदा लोखंडे, सागर गवळी, निर्मला गायकवाड, मनीषा पवार, शशिकांत कदम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर, सुलक्षणा धर, भाऊसाहेब भोईर आणि शिवसेनेच्या रेखा दर्शले, यांची निवड झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची जुलै महिन्याची सर्वसाधारण तहकूब सभा गुरुवारी आयोजित केली आहे. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी आहेत. महापालिकेच्या शिक्षण समितीतील पहिल्या वर्षातील सदस्यांचा एका वर्षांचा कार्यकाळ 8 जुलै रोजी संपला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जागी नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. महापालिकेतील पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेच्या एका अशा नऊ सदस्यांची निवड केली आहे.
सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी बंद पाकीटातून आपल्या पक्षाच्या सदस्यांची नावे महापौरांकडे दिली. त्यानंतर महापौर जाधव यांनी सदस्यपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर केले.
दरम्यान, शहर सुधारण समितीच्या भाजपच्या आशा शेंडगे आणि शिवसेनेच्या रेखा दर्शिले यांनी राजीनामा दिल्यामुळे दोन जागा रिक्त झाल्या आहेत. त्यारिक्त जागेवर भाजपच्या शर्मिला बाबर यांची तर शिवसेनेच्या सचिन भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.