सायबर भामट्यांचा ‘लाईक, सब्सक्राईब’चा नवा पॅटर्न; काही मिनिटांत तुमचे बँक खाते होईल रिकामे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 01:00 PM2023-04-08T13:00:38+5:302023-04-08T13:01:01+5:30
अनेक जणांना असाच लाईक, सबस्क्राईबचा मेसेज येत असून ते संबंधित भामट्यांच्या अमिषाला अनेक जण बळी पडत आहेत...
पिंपरी : तुमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर ‘तुम्ही फक्त आमचा युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्हाला घरबसल्या पैसे मिळतील.' असा मेसेज आला असेल तर सावधान. कारण असेच मेसेज करून तुमच्या बँक खात्यांमध्ये सुरुवातीला काही पैसे टाकून नंतर खात्यातील सर्वच पैसे काढून घेणारी सायबर भामटे ‘लाईक, सबस्क्राईब’चा नवा ‘टास्क फ्रॉड’ पॅटर्न राबवत आहेत. हिंजवडीमध्ये एका महिलेची असा मेसेज करून तिच्या खात्यातून तब्बल २० लाख रुपये काढून घेण्यात आले. तर, भोसरी पोलीस ठाण्यातील एकाच्या खात्यातील तीन लाख रुपये काढून घेतले. अनेक जणांना असाच लाईक, सबस्क्राईबचा मेसेज येत असून ते संबंधित भामट्यांच्या अमिषाला अनेक जण बळी पडत आहेत.
दिवसाला अवघे तीन युट्यूब चॅनेल सबस्काईब करून त्यातून दोन हजार ते १० हजार रुपये दिवसाला कमविण्याचे अमिष हे सायबर भामटे दाखवित आहेत. काम वेळेत पूर्ण केले म्हणून रिवॉर्डदेखील देत आहेत. एका महिलेच्या बँक खात्यामध्ये हे काम करत आहे म्हणून तिच्या बँक खात्यात सलग आठ दिवसांत दोन दोन हजार रुपये जमा केले. त्यानंतर महिलेला एक लिंक पाठवून त्यावर आमचे खाते ओपन करण्यास सांगून त्यावर तिचे पैसे जमा होतील असे सांगण्यात आले. महिलेच्या त्या खात्यावर सुरुवातीला काही पैसे जमा झाले. मात्र, महिलेने ज्या लिंकद्वारे ही माहिती भरली त्याद्वारे महिलेच्या बँकचे ऑनलाईन पासवर्ड तसेच बँक खाते हँडल करण्याचा ॲक्सेस मिळाला. त्याद्वारे चोरट्याने बँक खात्यातील सर्व पैसे काढून घेतले.