पिंपरी महापालिका प्रशासनाच्या वतीने भटक्या कुत्र्यांना ट्रॅक करण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 01:10 PM2020-01-16T13:10:35+5:302020-01-16T13:24:36+5:30
भटक्या कुत्र्यांमुळे भविष्यात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होणार
पिंपरी : शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. ही भटकी कुत्री आटोक्यात आणताना महापालिका प्रशासनाची दमछाक होत आहे. या कुत्र्यांना ट्रॅक करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा शोध घेणे शक्य होणार आहे.
प्राणीमित्र संस्थांनी आक्षेप घेतल्यामुळे भटक्या कुत्र्यांना जिवे मारण्यास बंदी घालण्यात आली आहे. परंतु, या कुत्र्यांकडून नागरिकांच्या जिवाला धोका आहे. यावर नियंत्रण आणले नाही तर भविष्यात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होणार आहे. अनेक वेळा विद्यार्थ्यांच्या मागे हे कुत्रे धावतात. तसेच महिन्यागणिक कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये वाढच होत आहेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
.................
रात्रीच्या वेळी उशिरा कामावरून येणाºया कामगारांना हे कुत्रे लक्ष करतात. रस्त्याने जाणाºया प्रवाशी नागरिकांच्या अंगावर ही कुत्री धावून जातात. त्यामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून भटक्या कुत्र्यांना पकडले जाते. पकडलेल्या कुत्र्यांवर नसबंदी करून पुन्हा ते परिसरामध्ये सोडले जातात. मात्र, भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी पालिका कोट्यवधी रुपये खर्च करते.
पण आता नेमकी संख्या कळणार असल्यामुळे यावर प्रतिबंध करणे शक्य होणार आहे. यात प्रत्येक वेळेस कुत्र्याला पकडताना त्याचा फोटो काढला जाणार आहे. त्याची निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केल्यावर व त्याला पुन्हा सोडून देताना त्याचा फोटो अपलोड केला जाणार आहे. एकदा त्या कुत्र्याचा फोटो अपलोड केला तर दुसºया वेळेस त्याच कुत्र्याचा फोटो सिस्टिम स्वीकारणार नाही. त्यामुळे कुत्र्यांची नेमकी मोजणी व त्यांना पकडणे सोयीस्कर होणार आहे.