नवीन वाहनांना ब्रेक टेस्ट सक्तीची, वाहतूक संघटनांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:56 AM2018-10-03T00:56:50+5:302018-10-03T00:57:09+5:30
वाहतूक संघटनांचा विरोध : पासिंगचे काम दिवे येथील ट्रॅकवर
पुणे : नवीन माल व प्रवासी वाहनांना आता ‘ब्रेक टेस्ट’ बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनांच्या पासिंगचे काम दिवे
येथील ट्रॅकवर होणार आहे. याबाबत राज्य शासनाने सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना सूचना दिल्या आहे. दरम्यान, या निर्णयाला वाहतूक संघटनांनी विरोध केला आहे. नवीन वाहनांना ब्रेक टेस्टसाठी ट्रॅकची सक्ती नको, अशी मागणी केली जात आहे.
वाहनांची तपासणी करून फिटनेस प्रमाणपत्र देण्यात कसूर केल्याप्रकरणी राज्य शासनाने नुकतेच ३७ वाहन निरीक्षकांना सेवेतून निलंबित केले आहे. त्याचबरोबर फिटनेस प्रमाणपत्र देण्याबाबत सक्त सूचनाही दिल्या आहे. नवीन वाहनांच्या पासिंगही आता काटेकोरपणे करण्याच्या सूचना देण्यात
आल्या आहेत. त्यानुसार यापुढे नवीन माल व प्रवासी वाहनांच्या ब्रेकची चाचणी ट्रॅकवर घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक, टेम्पो या प्रवासी व माल वाहतूक करणाऱ्या वाहनांचे ब्रेक टेस्टशिवाय पासिंग होणार नाही. पुण्यामध्ये विश्रांतवाडी येथे नवीन वाहनांची तपासणी करून पासिंग केले जात होते. याठिकाणी ब्रेक टेस्ट केली जात नव्हती. मात्र, शासनाच्या सूचनेनुसार यापुढे ब्रेक टेस्ट करावीच लागेल. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने नवीन वाहनांची ट्रॅकवर ब्रेक टेस्ट घेण्याचे बंधनकारक केले आहे. त्यानुसार दिवे येथील ट्रॅकवर ही टेस्ट होईल. यापूर्वी केवळ वाहनांची तपासणी होत होती, ब्रेक टेस्ट केली जात नव्हती. आता ब्रेक टेस्ट बंधनकारक असेल.
- विनोद सगरे,
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी