PCMC Election | महापालिका निवडणुकीसाठी नव्याने होणार प्रभागरचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 10:59 AM2022-04-13T10:59:33+5:302022-04-13T11:02:39+5:30
सध्या महापालिका निवडणुकीबाबत निवडणूक आयोग, राज्य सरकार आणि न्यायालय असा गोंधळ सुरू आहे...
पिंपरी : ओबीसी आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट असताना राज्याच्या नगर विकास विभागाने महापालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करावी, असे आदेश आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणूक लवकरच होणार असल्याचे दिसून येत आहे. पुन्हा १३९ वॉडांची रचना करावी लागणार आहे. मात्र, प्रभाग रचना, एक, दोन की तीन, चारनुसार करायची याबाबत संदिग्धता आहे.
महापालिका निवडणुकीबाबत निवडणूक आयोग, राज्य सरकार आणि न्यायालय असा गोंधळ सुरू आहे. ओबीसी आरक्षणामुळे गेल्या सहा महिन्यांपासून महापालिका निवडणूक खोळंबली आहे.
निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार महापालिकेने तीन सदस्यीय पद्धतीने प्रभाग रचना केली होती. त्यानुसार निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा १ फेब्रुवारी २०१२ रोजी प्रसिद्ध केला होता. 3 सदस्यांचे ४५ आणि ४ सदस्यांचा १ प्रभाग अशी रचना होती. या प्रभाग रचनेवर हरकती सूचना मागवून त्यावर सुनावणी झाली. त्याचा अहवालही आयोगाला दिला होता.
काय म्हटले आहे आदेशात....
महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ मधील अधिनियमानुसार मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणुकीसाठी लगतच्या जनगणनेनुसार प्रभागांची संख्या, रचना निश्चित करून प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार करावा. त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करावी. प्रभाग रचना करताना राज्य निवडणूक आयोगाच्या २८ डिसेंबर २०२१ आणि २७ जानेवारी २०२२ च्या आदेशातील कार्यपद्धतीस अनुसरून करावी, असे उपसचिव प्रियांका कुलकर्णी - छापवाले यांनी महापालिका आयुक्तांना याबाबतचे परिपत्रक पाठविले आहे.
राज्य शासनाचे महापालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे पत्र मंगळवारी (दि. १२) दुपारी मिळाले. मात्र, काय करायचे याबाबत सूचना नाही. इतर महापालिका काय निर्णय घेतात, हे पाहू. राज्य शासनाकडून अभिप्राय मागविल्यानंतर प्रक्रिया सुरु केली.
- जितेंद्र वाघ, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी महापालिका