PCMC Budget: पिंपरी-चिंचवड शहराच्या पूर्व, पश्चिम भागात नव्या जलवाहिन्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 12:45 PM2024-02-21T12:45:02+5:302024-02-21T12:46:29+5:30
निगडीतील सेक्टर २३ जलशुद्धीकरण केंद्रात अद्ययावत तंत्रज्ञानानुसार प्रणाली उभारण्यात येणार आहे...
पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांचा विकास झपाट्याने होत आहे. या आर्थिक वर्षात वाकड, ताथवडे, रावेत, थेरगाव, पुनावळे, चिखली, मोशी, जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी, डुडुळगाव, भोसरी, दिघी, चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी भागात जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
निगडीतील सेक्टर २३ जलशुद्धीकरण केंद्रात अद्ययावत तंत्रज्ञानानुसार प्रणाली उभारण्यात येणार आहे. या केंद्रापासून दापोडीपर्यंत जलवाहिनी टाकणे, प्रत्येक घराला नळ जोडणी देण्यात येणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भामा आसखेड धरणाजवळ वाकीतर्फे वाडा येथे २०० दशलक्ष लिटर प्रतिदिनी क्षमतेचे जलउपसा केंद्र बांधण्यात येणार आहे.
चिखलीत २०० दशलक्ष लिटरचे जलशुद्धीकरण
आंद्रा व भामा आसखेड योजनेंतर्गत चिखली येथे २०० दशलक्ष लिटर प्रतिदिनी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. भामा आसखेड धरण ते नवलाख उंब्रे येथील बीपीटीपर्यंत १७०० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी व नवलाख उंब्रे येथील बीपीटी ते देहूपर्यंत १४०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.