भाजपामध्ये उफाळला नवा-जुना वाद
By admin | Published: January 25, 2017 02:02 AM2017-01-25T02:02:15+5:302017-01-25T02:02:15+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातील जुन्या-नव्याचा वाद उफाळून आहे. कार्यकर्त्यांची
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातील जुन्या-नव्याचा वाद उफाळून आहे. कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या जुन्या आणि नवीन कार्यकर्त्यांची बैठक झाली.
निवडणुकीत जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आवाहन करण्यात आले. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितल्याने कार्यकर्ते शांत झाले.
उमेदवारीअर्ज दाखल करण्यास आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. मात्र, शिवसेना, भारतीय जनता पक्षाची युतीची केवळ चर्चा सुरू आहे. जागांवर चर्चा अडकली आहे. तर दुसरीकडे युतीबाबत भारतीय जनता पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. काही जण युती आवश्यक असल्याचे सांगतात, तर काही जण युती केल्यास कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ शकतो. त्यामुळे शहरातील पक्षाचे स्थान पाहून युतीचा निर्णय घ्यावा, असे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
तसेच शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे आणि माजी महापौर आझम पानसरे यांच्याच समर्थकांना उमेदवारी मिळणार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते जाहीरपणे सांगत आहेत. त्यामुळे पक्षाचे मूळ कार्यकर्ते नाराज आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्या आणि नवीन कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेत्यांच्या दोन बैठका झाल्या.
त्या वेळी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आझम पानसरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. एका बैठकीत खडाजंगी झाल्यानंतर ही बाब पालकमंत्र्यांच्या कानावर गेली. त्यांनी सायंकाळी साडेसात ते रात्री दहा या दरम्यान सोमाटणे फाटा येथे जुन्या कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेतली.
(प्रतिनिधी)