वैवाहिक सुख न देता पतीकडून नववधूचा छळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 04:11 PM2019-12-11T16:11:38+5:302019-12-11T16:19:27+5:30
फ्लॅट घेण्यासाठी आईवडिलांकडून १० लाख रुपये घेऊन ये असा लावला तगादा..
पिंपरी : लग्नानंतर नवरा म्हणून जबाबदारी पार न पाडता नववधूस वैवाहिक सुख दिले नाही. तसेच फ्लॅट घेण्यासाठी आईवडिलांकडून १० लाख रुपये घेऊन ये, असे सांगून विवाहितेचा छळ केला. रुपीनगर, तळवडे येथे १९ फेब्रुवारी ते डिसेंबर २०१९ दरम्यान हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी २७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिच्या ३३ वर्षीय पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आंबेगाव तालुक्यातील असून, त्याने फिर्यादी यांच्याशी लग्न झाल्यापासून नवरा म्हणून जबाबदारी पार पाडणे आवश्यक असताना तसे केले नाही. फिर्यादी यांच्याशी खोटे बोलून विविध आश्वासने देऊन ती पूर्ण न करता लग्नानंतर नववधू म्हणून सासरी असताना त्यांना वैवाहिक सुख दिले नाही. त्यांच्या लग्नाचा २० लाखांचा खर्च फिर्यादी महिलेच्या आईवडिलांनी केला असतानाही फ्लॅट घेण्याच्या कारणावरून आईवडिलांकडून १० लाख घेऊन ये, आरोपीने फिर्यादी यांनी सांगितले. तसेच मारहाण करून शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास देऊन फिर्यादी महिलेला आरोपीने स्वत:पासून दूर ठेवून पत्नीच्या गरजा पूर्ण न करता त्यांचे वैवाहिक जगणे असह्य करून त्यांचा छळ केला. चिखली पोलीस तपास करत आहेत.