आमदारपुत्राच्या प्रतापाने अधिकारी धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 02:31 AM2018-07-10T02:31:43+5:302018-07-10T02:31:53+5:30
कासारवाडीतील उड्डाणपुलावर मित्र-मैत्रिणींबरोबर मध्यरात्री एकच्या सुमारास वाढदिवस साजरा करणाऱ्या आमदारपुत्राला हटकणा-या पोलीस अधिकारी महिलेला कारवाईस सामोरे जावे लागले आहे.
पिंपरी : कासारवाडीतील उड्डाणपुलावर मित्र-मैत्रिणींबरोबर मध्यरात्री एकच्या सुमारास वाढदिवस साजरा करणाऱ्या आमदारपुत्राला हटकणा-या पोलीस अधिकारी महिलेला कारवाईस सामोरे जावे लागले आहे. आमदारांच्या तक्रारीवरून वरिष्ठांनी पोलीस उपनिरीक्षक महिलेला नोटीस बजावली. त्यानंतर खातेनिहाय चौकशी झाली. या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर पोलीस अधिकारी महिलेवर खात्यांतर्गत कारवाईचा निर्णय शनिवारी झाला. त्याचबरोबर यापुढे लोकप्रतिनिधी अथवा त्यांचे नातेवाईक यांच्याशी उद्धट वर्तन करू नये, अशी सक्त ताकीदही देण्यात आली. दरम्यान, लोकप्रतिनिधींच्या तक्रारीवरून पोलीस अधिकाºयांना अशा मानहानीकारक कारवाईला सामोरे जावे लागत असल्याने त्यांचे मनोधैर्य खच्ची होत असल्याची चर्चा शहरात आहे.
शिवसेनेचे पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचे चिरंजीव मित्र-मैत्रिणींना बरोबर घेऊन कासारवाडीतील उड्डाणपुलावर वाढदिवस साजरा करीत होते. काही जण फटाके फोडण्याच्या तयारीत होते. मध्यरात्री एकच्या सुमारास भररस्त्यात जल्लोषात वाढदिवस साजरा करण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरू होता. पोलीस उपनिरीक्षक रुपाली पाटील यांच्या ही बाब निदर्शनास आली असता, त्यांनी ग्रुपला हटकले. रात्रीच्या वेळी सार्वजनिक शांततेचा भंग होईल, असे काही करू नका, असे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या वेळी आमदारपुत्राने ‘मी आमदारांचा मुलगा आहे. तुम्ही आम्हाला येथे वाढदिवस साजरा करण्यास मज्जाव करू शकत नाहीत’ असे पाटील यांनाच दटावले. पोलिसांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत कोणीही नव्हते. पालकांशी संपर्क साधून ‘पोलीस ठाण्यात भेटा’ असा निरोपही दिला. मात्र, या घटनेनंतर आमदार चाबुकस्वार यांनी थेट पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे पाटील यांची तक्रार
केली. तसेच मुलाच्या कानफटात मारली, असाही आरोप केला. २१ आॅक्टोबर २०१७ ला घडलेल्या या घटनेसंबंधी आलेल्या तक्रारीची पोलीस आयुक्त शुक्ला यांनी गंभीर दखल घेतली. तसेच पाटील यांच्यावर कारवाई केली आहे. अशा कारवाईमुळे पोलीस अधिकारी, कर्मचाºयांचे मनोबल खच्ची होते, अशी खंत व्यक्त होत आहे.
लोकप्रतिनिधींकडून अधिकाराचा गैरवापर होत असल्याबद्दलही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कासारवाडी येथे आॅक्टोबर २०१७ मध्ये मुलाला वाढदिवस साजरा करताना, पोलीस अधिकारी महिलेने हटकले. उद्धट वर्तन केले. याबाबत पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे पोलीस अधिकारी महिलेची तक्रार केली होती. किरकोळ प्रकार असल्याने त्याकडे नंतर दुर्लक्ष केले. याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर पुढे काय झाले, याबद्दल माहिती नाही. त्यामुळे आता काही सांगता येणार नाही. - गौतम चाबुकस्वार, आमदार