नीती आयोगाचा महापालिका शाळेला निधी; वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसाठी दिले प्रोत्साहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 03:29 AM2018-01-10T03:29:35+5:302018-01-10T03:30:14+5:30
वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, वैज्ञानिक घडावेत, यासाठी केंद्र सरकारच्या नीती आयोगाने माध्यमिक शाळांना विज्ञान प्रयोगशाळा देण्याची योजना सुरू केली आहे. त्यामध्ये यावर्षी देशभरातील सुमारे पंधराशे शाळांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.
पिंपरी : वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, वैज्ञानिक घडावेत, यासाठी केंद्र सरकारच्या नीती आयोगाने माध्यमिक शाळांना विज्ञान प्रयोगशाळा देण्याची योजना सुरू केली आहे. त्यामध्ये यावर्षी देशभरातील सुमारे पंधराशे शाळांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव येथील महापालिकेची माध्यमिक शाळा आणि काळेवाडीतील विद्यादीप अशा दोन शाळांची निवड झाली आहे.
केंद्र सरकारच्या नीती आयोगाने गेल्या वर्षीपासून माध्यमिक शाळांना विज्ञान प्रयोगशाळा देण्याची योजना सुरू केली आहे. त्यासाठी शाळांनी विज्ञान प्रकल्प उभारण्यासाठी पंधराशे चौरस फुटांची जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या योजनेत देशातील पंधराशे शाळांची निवड झाली आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील अकरा शाळांची निवड झाली आहे. त्यात दोन शाळा पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील आहेत.
नीती आयोगाच्या नवीन योजनेनुसार विज्ञान प्रयोग शाळेस पहिल्यावर्षी दहा लाख रुपये मिळणार असून उर्वरित रक्कम दुसºया वर्षी मिळणार आहे. या निधीतून
संबंधित संस्थेला प्रयोग शाळा उभारणीचे काम करायचे आहे. त्यासाठी आवश्यक ते साहित्य खरेदी करण्याचे अधिकार संस्थांना दिले आहेत. ही प्रयोग शाळा एखाद्या संस्थेत असली तरी संबंधित संस्थेबरोबरच परिसरातील अनेक शिक्षण संस्था किंवा मुले या प्रयोग शाळेचा लाभ घेऊ शकणार आहेत. सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, गणित, रोबोटिक्स आदी विषयांसाठी ही प्रयोगशाळा उपयोगात आणली जाणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव देण्यात येणार आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, वैज्ञानिक घडावेत, यासाठी केंद्र सरकारने चांगला
उपक्रम सुरू केला आहे. नीती आयोगाने निवडलेली महापालिका परिसरातील महापालिकेची पिंपळे गुरवची एकमेव शाळा आहे. विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम चांगला आहे. तसेच या प्रयोग शाळेत विद्यार्थ्यांना शहरातील मान्यवर कंपन्यांतील अभियंतेही मार्गदर्शन करू शकतात.
मान्यवर अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना संशोधन करता येणार आहे. त्यातून वैज्ञानिक घडावेत, संशोधन व्हावे, नवनिर्मिती व्हावी, हा उद्देश आहे. या प्रयोगशाळेचा लाभ अन्य शाळांतील विद्यार्थीही घेऊ शकतात. आमच्या शाळेची निवड झाली असल्याने खूप आनंद झाला आहे. भविष्यात या प्रयोगशाळेतून चांगले प्रकल्प निर्माण करण्याचा प्रयत्न असणार आहे, असे पिंपळे गुरव येथील शाळेचे मुख्याध्यापक सुचित्रानंद वडगणे यांनी सांगितले.