निगडी ते देहूरोड : महामार्गाचे रुंदीकरण महिनाभरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 03:05 AM2018-06-12T03:05:47+5:302018-06-12T03:05:47+5:30
गेल्या १२ वर्षांपासून रखडलेल्या बहुचर्चित मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण गेल्या दीड वर्षात 98 टक्के पूर्ण झाले असून, महिनाभरात चौपदरीकरण व आनुषंगिक कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले आहे.
देहूरोड - गेल्या १२ वर्षांपासून रखडलेल्या बहुचर्चित मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण गेल्या दीड वर्षात 98 टक्के पूर्ण झाले असून, महिनाभरात चौपदरीकरण व आनुषंगिक कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले आहे. चौपदरी रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, रस्त्याच्या दुभाजकात बसविलेले पथदिव्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी पांढरे पट्टे मारण्याची कामे वेगात सुरू झाली आहेत. स्थलदर्शक व मार्गदर्शक फलक बसविणेची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने गतवर्षी डिसेंबर महिन्यात कंत्राटदारास कामाचा आदेश दिल्यानंतर संबंधित कंत्राटदाराने रुंदीकरणास होणारा झाडांचा अडथळा वगळता रस्ता रुंदीकरण कामे वेगात पूर्ण करण्याकडे लक्ष दिल्याने कामे पूर्णत्वाकडे चालली असल्याचे चित्र दिसून आले आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामामार्गावरील निगडीतील भक्ती -शक्ती चौक ते देहूरोड पोलीस ठाण्याजवळील सेंट्रल चौक (किमी 20.400 ते किमी 26.540) दरम्यानच्या रस्त्याचे (उड्डाणपूल व एलिव्हेटेड रस्त्याचा भाग वगळून) चौपदरीकरणाचे काम मुंबईतील पी बी ए इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी या कंत्राटदारामार्फत करण्यात येत असून, संबंधित कामासाठी ३९ कोटी ६ लाख १३ हजार ८९२ खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे.
राज्यातील सर्वाधिक वर्दळीचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून परिचित असलेल्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गाचा देहूरोड ते निगडी दरम्यानचा सव्वासहा किलोमीटर अंतराचा रस्ता दुपदरी असल्याने वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनलेला होता. रुंदीकरण रखडल्याने बारा वर्षांत विविध अपघातांत साडेतीनशेहून अधिक बळी गेले असून, अनेक जखमी झाले आहेत. काहीजण कायमचे जायबंदी झाले आहेत.
देहूरोड येथील आयुध निर्माणी प्रवेशद्वार व केंद्रीय विद्यालय
क्रमांक एक येथे भुयारी मार्ग पूर्ण झाले असून, त्यावर डांबरी रस्ता करण्यात आला आहे. त्यावर वाहतूक सुरू झाली आहे. भुयारी मार्गाच्या आतील व सेवा रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होणार असून, उर्वरित कामेही वेगात सुरू आहे.
उर्वरित कामे महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन
दीड वर्ष संबंधित रस्त्याचे चौपदरीकरण काम करणाऱ्या ठेकेदारामार्फत निगडी ते देहूरोड आयुध निर्माणी प्रवेशद्वारापर्यंत, तसेच देहूरोड पोलीस ठाणे ते गुरुद्वारापर्यंत चौपदरीकरण पूर्ण झाले आले असून, संबंधित भागात दुभाजक बांधण्याचे कामही पूर्ण झाले आहे. दुभाजकात पथदिव्यांसाठी खांब बसविण्यात आले असून, निगडी जकात नाका ते देहूरोड जकात नाक्यापर्यंत एलईडी दिवे प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले आहेत. निगडी ते देहूरोड, तसेच देहूरोड गुरुद्वारा ते देहूरोड पोलीस ठाणे दरम्यान रस्त्यावर वाहतूक सुरक्षेसाठी पांढरे पट्टे मारण्याचे काम वेगात सुरू आहे. येत्या महिन्यात स्थलदर्शक व मार्गदर्शक फलक बसविण्यासह उर्वरित सर्व आनुषंगिक कामे पूर्ण करून वाहतूक सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानच्या दुपदरी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे 98 टक्के काम पूर्ण झाले असून, महिनाभरात स्थलदर्शक व मार्गदर्शक फलक बसविणे, वाहतूक सुरक्षाविषयक व आनुषंगिक सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. - संजय गांगुर्डे, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ, मुंबई