निगडी-पिंपरी मेट्रो मार्गाचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीपुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 02:54 AM2018-12-11T02:54:52+5:302018-12-11T02:55:18+5:30
महापालिका भवन ते निगडी यादरम्यान उभारण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पासाठी एक हजार ४८ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
पिंपरी : येथील महापालिका भवन ते निगडी यादरम्यान उभारण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पासाठी एक हजार ४८ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल अर्थात डीपीआर महामेट्रोने तयार केला असून महापालिकेच्या स्थायी समिती समोर ठेवला आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते पिंपरी या मेट्रोला मंजुरी मिळाली. मात्र, पहिल्या टप्प्यातच ही मेट्रो निगडीपर्यंत नेण्याची मागणी भाजपा, शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसे आदी राजकीय पक्षांनी केली होती. मात्र, त्यावर अधिक खर्च होणार असल्याने हा मार्ग लांबणीवर पडला होता. त्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांनी महामेट्रोला डीपीआर तयार करण्यास सांगितले. महामेट्रोने ‘सिस्ट्रा’ या आंतरराष्ट्रीय एजन्सीकडून हा डीपीआर तयार करून घेतला आणि महापालिकेकडे सादर केला. सप्टेंबर महिन्यातच तयार झालेला हा डीपीआर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आॅक्टोबरमध्ये सादर केला.
महामेट्रो आणि सिस्टाच्या अधिकाºयांनी या बाबतचे प्रेझेंटेशन महापालिका आयुक्त हर्डीकर आणि अन्य अधिकाºयांसमोरही केले आहे. हा डीपीआर स्थायी समिती सभेत मांडण्यासाठी मुहूर्त मिळाला आहे. स्थायी समितीतर्फे हा अहवाल महापालिका सभेत जाणार असून, त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारकडे तो सादर करण्यात येणार आहे.
महापालिका भवन ते निगडीपर्यंत ही मेट्रो जाणार असून, या मार्गाचे एकूण अंतर ४.४१३ किलोमीटर असून, मार्गावर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी या तीन ठिकाणी मेट्रो स्टेशन असणार आहे. भूसंपादन करणे आणि सेवा वाहिन्यांचे स्थलांतर करणे आदी कामासाठी १०४८.२२ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
महापालिका भवन ते निगडी अंतर ४.४१३ किलोमीटर.
चिंचवड, आकुर्डी आणि निगडी हे तीन मेट्रो स्टेशन असणार.
प्रकल्पाच्या कामासाठी भूसंपादन करणे आणि सेवा वाहिन्यांचे स्थलांतरासाठी १०४८.२२ कोटी खर्च