रात्रीही केले जाते खोदकाम, रावेत प्राधिकरणातील समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 02:28 AM2018-07-12T02:28:46+5:302018-07-12T02:29:01+5:30
रावेत येथील प्राधिकरण पेठ क्रमांक २९ मधील मोकळ्या जागेत सध्या रुग्णालयाचे बांधकाम चालू आहे. नियम धाब्यावर बसवून रात्रीही येथे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाचा पाया खोदण्यासाठी आणि तळघराचे काम करण्याकरिता खडक फोडण्यात येत आहे.
रावेत - येथील प्राधिकरण पेठ क्रमांक २९ मधील मोकळ्या जागेत सध्या रुग्णालयाचे बांधकाम चालू आहे. नियम धाब्यावर बसवून रात्रीही येथे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाचा पाया खोदण्यासाठी आणि तळघराचे काम करण्याकरिता खडक फोडण्यात येत आहे. त्यासाठी यंत्रांचा वापर केला जात आहे. या यंत्रांच्या आवाजाने परिसरातील रहिवाशांना त्रास होत आहे. दिवसा आणि रात्रीही ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सहा महिन्यांपासून हे काम सुरू आहे. संबंधितांकडे याबाबत तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडे स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रार केली आहे. रुग्णालयाच्या उभारणीसाठी सुरू असलेल्या खोदकामाविरोधात पेठ क्र. २९ मधून तक्रारींचा सूर उमटत असतानाच आता या प्रकल्पाबाबत भीती व्यक्त होत आहे. मात्र या कामामुळे परिसरातील इमारतींना धोका पोहोचेल, अशी भीती येथील रहिवाशांना वाटत आहे. मोकळ्या भूखंडावर सध्या मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. मागील पाच ते सहा महिन्यांपासून या परिसरात खोदकामाला सुरुवात झाली आहे. या कामामुळे परिसरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात रुग्णालयाच्या खोदकामाच्या हादऱ्यामुळे येथील रहिवासी धास्तावले आहेत.
इमारतींना हादरे बसत असल्याच्या तक्रारी रहिवासी करीत आहेत. या ठिकाणी राहणाºया ज्येष्ठ नागरिकांना फारच त्रास सोसावा लागत आहे. ध्वनिप्रदूषणाचे सगळे नियम व आदेश धाब्यावर बसवून दिवसा आणि रात्रीही बांधकाम सुरू आहे. येथील कामगार आरडाओरडा करतात.
मोबाइलवर कर्णकर्कष आवाजात गाणी वाजवतात. याचाही त्रास नागरिकांना होतो. काम सुरू झाल्यापासून जणू काही भूकंप झाल्यासारखे धक्के आमच्या इमारतीला जाणवत आहेत, अशी तक्रार प्रशांत भोसल आणि रावेत प्राधिकरण नागरिक समितीचे अध्यक्ष रवींद्रनाथ शिंदे यांनी केली. सदर बांधकाम त्वरित थांबवावे व येथील रहिवाशांना होणारा ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा त्रास तत्काळ थांबवावा, अशी मागणी येथील नागरिकांनी प्राधिकरण कार्यालयाकडे केली आहे.
महापालिकेच्या शाळांसह शहरातील सर्व शाळा नियमितपणे सुरू झाल्या आहेत. अनेक क्लासेस आणि अभ्यासक्रमांचे वर्ग ही सुरू झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून अभ्यास, गृहपाठ करून घेण्यात येत आहे. शाळेचा अभ्यास घरी करण्यावर अनेक विद्यार्थ्यांचा भर असतो. मात्र, येथील खोदकामांमुळे रात्रीही या विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्य होत नाही. परिणामी या परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पालकांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दिवसा खोदकाम करण्यास परवानगी असते. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून रुग्णालयाच्या बांधकामासाठी रात्रीही खोदकाम करण्यात येत आहे. दगड असल्याने हे खोदकाम करताना मोठ्याप्रमाणात आवाज होतो. मात्र, या समस्येकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप या परिसरातील हाउसिंग सोसायट्यांमधील नागरिकांकडून होत आहे.
ध्वनिप्रदूषण : प्रभावित झालेल्या सोसायट्या
रुग्णालयाच्या बांधकामासाठी करण्यात येणा-या खोदकामामुळे या परिसरातील हाउसिंग सोसायट्यांतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील गणेश हाउसिंग सोसायटी, महालक्ष्मी रेसिडेंसी, निलय अपार्टमेंट, यजुर्वेद हाउसिंग सोसायटी, ओढावरम होस्टेल, निलय हाउसिंग सोसायटी- फेज २, जीवनश्री अपार्टमेंट आदी हाउसिंग सोसायट्यांतील नागरिकांना या ध्वनिप्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.