मुंबईच्या धर्तीवर पुणे आणि नागपुरातही नाईट लाईफ
By admin | Published: August 12, 2016 10:09 PM2016-08-12T22:09:15+5:302016-08-12T22:09:36+5:30
मुंबईच्या धर्तीवर पुणे आणि नागपुरात आता रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार उघडे ठेवण्यास शासनाने परवानगी दिली
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 12 - मुंबईच्या धर्तीवर पुणे आणि नागपुरात आता रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार उघडे ठेवण्यास शासनाने परवानगी दिली असून राज्यपालांच्या आदेशाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये यापुढे रात्री दिड वाजेपर्यंत हॉटेल्स उघडी राहणार आहेत. यापुर्वी मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, नव्या आदेशानुसार पुणे आणि नागपुर पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रातील हॉटेलसाठी रात्री दिडची वेळ निश्चित करण्यात आल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पुणे आयुक्तालयातील हॉटेल्स रात्री अकरा वाजता पोलिसांकडून बंद करण्यात येत होते. काही ठराविकच हॉटेल्स आणि बारला पोलिसांकडून अभय दिले जात होते. अनेकदा ओरड होऊनही या हॉटेल्सवर कारवाई केली जात नव्हती. मात्र, या नव्या आदेशामुळे सर्वच हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. रात्री उशीरापर्यंत हॉटेल्स सुरु राहणार असल्यामुळे पुणेकरांनाही उशिरापर्यंत हॉटेलिंगचा आस्वाद घेता येणार आहे. बार आणि रेस्टॉरंटमधून रात्री उशिरापर्यंत मद्य पुरवण्यासही परवानगी देण्यात आलेली असल्यामुळे मद्यपींचेही फावणार आहे.
या नव्या आदेशानुसार, औरंगाबाद, नाशिक आणि अमरावती तसेच सोलापूर आयुक्तालयाच्या हद्दीतील हॉटेल्सना रात्री साडेअकरापर्यंत खाद्यपदार्थ व मद्यपदार्थ पुरवण्यास परवानगी देण्यात आली असून केवळ हॉटेल्सची वेळ साडेबारा असणार आहे. उर्वरीत महाराष्ट्रासाठी खाद्यपदार्थांसह मद्य देणा-या हॉटेल्सची वेळ रात्री दहा तर केवळ खाद्यपदार्थ देणा-या हॉटेल्सची वेळ साडेअकरा करण्यात आली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या आदेशाने बजावलेला हा आदेश गृहमंत्रालयाने जारी केला आहे.