Pune | नऊ महिन्यांत रिचवली साडेनऊ कोटी लिटर दारू; देशी, विदेशी दारूपेक्षा थंडगार बिअरला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 04:37 PM2023-01-21T16:37:20+5:302023-01-21T16:38:28+5:30

महसुलात मोठी वाढ होऊन शासनाच्या तिजोरीत भर...

Nine and a half crore liters of liquor were sold in nine months; Cold beer is preferred over local and foreign liquor | Pune | नऊ महिन्यांत रिचवली साडेनऊ कोटी लिटर दारू; देशी, विदेशी दारूपेक्षा थंडगार बिअरला पसंती

Pune | नऊ महिन्यांत रिचवली साडेनऊ कोटी लिटर दारू; देशी, विदेशी दारूपेक्षा थंडगार बिअरला पसंती

Next

- नारायण बडगुजर 

पिंपरी : कोरोना महामारीमुळे लाॅकडाऊन केल्याने सर्वच क्षेत्र ठप्प झाले होते. त्यात २०२० मध्ये एप्रिल महिन्यात मद्यविक्री पूर्णपणे बंद होती. मात्र, त्यानंतर निर्बंधमुक्ती होताच मद्यपी सुसाट सुटले असून त्यांनी कोट्यवधी रुपंयाचे मद्य रिचवले. त्यामुळे महसुलात मोठी वाढ होऊन शासनाच्या तिजोरीत भर पडली. यात एप्रिल ते डिसेंबर २०२२ या नऊ महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवडसह पुणे शहर व जिल्ह्यात नऊ कोटी ४९ लाख १९ हजार ३१३ लिटर मद्याची विक्री झाली.   

लाॅकडाऊनमध्ये निर्बंध शिथील करून मद्याच्या ऑनलाइन विक्रीला परवानगी देण्यात आली. त्यामुळे घरपोहच मद्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र, निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आल्यानंतर मद्यविक्री पूर्ववत होण्यास मदत झाली. तसेच पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे जिल्ह्यात परराज्यातील मद्याची वाहतूक, साठा व विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क (एक्साइज) विभागाकडून मोठी कारवाई झाली. यात गोवा राज्यातील बनावट तसेच बेकायदेशीर मद्याचा साठा मोठ्या प्रमाणात जप्त केला. पिंपरी-चिंचवड, चाकण तसेच एमआयडीसी भागातील बनावट मद्याच्या कारखान्यांवर छापेमारी केली. 

संयुक्त कारवाईचा परिणाम

अवैध दारू विक्री आणि गावठी दारूची हातभट्टीवर एक्साइज तसेच पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून कारवाई केली. गुन्हे दाखल करून मोठ्या संख्येने आरोपींना अटक केली. न्यायालयात त्यांच्यावर दोषसिद्धी होऊन दंडात्मक कारवाई झाली.  

अवैध दारू विक्री, वाहतूक, साठा करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली जात आहे. गावठी दारूच्या हातभट्टी, बनावट दारूचे कारखाने उद्ध्वस्त करण्यात येत आहेत. तसेच आरोपींवर कायदेशीर कारवाई होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातून अवैध दारू विक्रीला आळा बसला आहे. परिणामी अधिकृत मद्य विक्रीत वाढ झाली.

- चरणजितसिंग राजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे 

बिअरचा थंडावा, हवा हवासा...

स्वस्त मिळते म्हणून देशी दारू घेणाऱ्या तळीरामांची संख्या मोठी आहे. तसेच विदेशी मद्य आणि बिअर घेणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. पार्टी तसेच एन्जाॅयमेंट म्हणून देखील बिअरला पसंती दिली जाते. त्यामुळे देशी व विदेशी मद्याच्या तुलनेत थंडगार बिअरची विक्री जास्त झाली. २०२० ते २०२२ या कालावधीत मद्यविक्रीच्या टक्केवारीत मोठी वाढ झाली. यात बिअरची विक्री ९२.५ टक्क्यांनी वाढली. देशी ३३.७६ तर विदेशी मद्य ४३.४० टक्के जास्त विक्री झाले.  

एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षनिहाय झालेली मद्यविक्री

देशी दारू

वर्ष - विक्री (कोटी लिटरमध्ये)

२०१८ -१९ : २,८३,८१,४२९
२०१९-२० : २,८८,६७,८५१
२०२०-२१ : २,५६,७७,३५५
२०२१ -२२ : २,७०,७०,४१२
२०२२ (एप्रिल ते डिसेंबर) : २,३२,८१,३६४

विदेशी दारू

वर्ष - विक्री (कोटी लिटरमध्ये)

२०१८ -१९ : ३,३५,२५,०७७
२०१९-२० : ३,४७,८०,१७०
२०२०-२१ : ३,१७,१५,५२६
२०२१ -२२ : ३,४८,७४,५८८
२०२२ (एप्रिल ते डिसेंबर) : ३,१८,०३,८५१

बिअर

वर्ष - विक्री (कोटी लिटरमध्ये)

२०१८ -१९ : ४,९८,९९,६२६
२०१९-२० : ५,००,५२,५२१
२०२०-२१ : ३,२२,६८,४६९
२०२१ -२२ : ३,५१,७०,३९२
२०२२ (एप्रिल ते डिसेंबर) : ३,९८,३४,०९८

Web Title: Nine and a half crore liters of liquor were sold in nine months; Cold beer is preferred over local and foreign liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.