Pune Crime | बिल्डरकडे नऊ कोटींच्या खंडणीची मागणी; धमकावणारा ठग जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 08:55 PM2022-05-28T20:55:16+5:302022-05-28T21:00:01+5:30

डांगे चौक येथे सापळा रचून केली कारवाई...

Nine crore ransom demand from builder Intimidating thugs arrested by police | Pune Crime | बिल्डरकडे नऊ कोटींच्या खंडणीची मागणी; धमकावणारा ठग जाळ्यात

Pune Crime | बिल्डरकडे नऊ कोटींच्या खंडणीची मागणी; धमकावणारा ठग जाळ्यात

Next

पिंपरी : बांधकाम व्यावसायिकाकडे नऊ कोटींची खंडणी मागून त्यातील दोन कोटींचा धनादेश स्वीकारताना पोलिसांनी एका ठगाच्या मुसक्या आवळल्या. बांधकाम व्यावसायिकांना तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आरोप करून त्यांना धमकावल्या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. खंडणी आणि गुंडा विरोधी पथकाने शुक्रवारी (दि. २७) डांगे चौक येथे सापळा रचून ही कारवाई केली. 

आदिनाथ बी. कुचनुर (रा. डांगे चौक) असे अटक करण्यात केलेल्याचे नाव आहे. केतूल भागचंद सोनिगरा (वय ४१, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २७) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची डांगे चौक येथे सिग्नेचर पार्क नावाने बांधकाम साईट सुरू आहे. दरम्यान, आरोपीने त्यांना फोन करून बांधकामात खूप त्रुटी असल्याचे सांगितले. तसेच, त्यांच्या विरोधात नॅशनल ग्रीन ट्रिबुनलकडे खोटे अहवाल सादर करून अडचणीत आणण्याची धमकी दिली. त्यासाठी त्यांच्याकडे सव्वानऊ कोटींची खंडणी मागितली. 

दरम्यान, फिर्यादी यांनी पोलिसात तक्रार केली. त्यानुसार, खंडणी व गुंडा विरोधी पथकाने फिर्यादीच्या ऑफिसमध्ये साध्या वेशात सापळा रचून आरोपीला खंडणीची रक्कम नेण्यास बोलविले. त्यावेळी फिर्यादीने ठरलेल्या रकमेपैकी दोन कोटींचा धनादेश आरोपीला दिला. आरोपीने धनादेश हातात घेताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. आरोपीला शनिवारी (दि. २८) मोरवाडी न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, डाॅ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, सहायक निरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी हजरत पठाण, विक्रम जगदाळे, गणेश मेदगे, किरण काटकर, शाम बाबा, विजय तेलेवार, आशिष बोटके, तौसिफ शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.  

तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन 
निवृत्त न्यायाधीशांची कागदपत्रे बनविणे, बांधकाम व्यवसायिकांना ब्लॅकमेल करणे, महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर खोटे आरोप करून त्यांना वेठीस धरणे, वास्तुविशारदांची बदनामी करणे, अशा आरोपांखाली हिंजवडी, पिंपरी, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हे दाखल आहेत. आरोपीने दोन वर्ष कारावासही भोगला आहे. कोणीही खंडणीची मागणी करीत असल्यास न घाबरता नागरिकांनी तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Nine crore ransom demand from builder Intimidating thugs arrested by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.