दारु, सिगारेट गुटख्यासह नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त; सामाजिक सुरक्षा पथकाची कुदळवाडी, हिंजवडीत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 10:54 AM2021-01-25T10:54:48+5:302021-01-25T10:56:21+5:30
तंबाखूजन्य गुटखा साठा करून ठेवला असून त्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पिंपरी : विनापरवाना विक्री होत असलेली दारु, सिगारेट तसेच गुटखा पोलिसांनी छापा मारून जप्त केला. चिखली व हिंजवडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत केलेल्या या कारवाईत एकूण नऊ लाख ३५ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने शनिवारी ही कारवाई केली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, डायमंड पान स्टोअर व भास्कर चाैधरी यांच्या कुदळवाडी येथील पत्र्याच्या गोडावूनमधून तंबाखूजन्य गुटखा साठा करून ठेवला असून त्याची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा मारला.
२३ हजार ६३० रुपयांची रोकड, पाच लाख ५४ हजार ३६३ रुपयांचा गुटखा, २५२० रुपयांचे सिगारेट, ३० हजार रुपयांचे दोन मोबाईल, ५५ हजारांची दुचाकी असा एकूण सहा लाख ६५ हजार ५१३ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तसेच पुनाराम वोराराम सिरवी (वय २२, रा. शाहूनगर, चिखली) याच्यासह अन्य एका जणाविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हिंजवडी फेज ३ येथे भोईरवाडी परिसरात विनापरवाना दारुची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा मारला. दोन लाख ५० हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन, आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन, ११ हजार ५३२ रुपये किमतीच्या विदेशी दारु व बिअरच्या बाटल्या, असा एकूण दोन लाख ६९ हजार ५३२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहायक निरीक्षक डाॅ. अशोक डोंगरे, उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, सहायक फाैजदार विजय कांबळे, संदीप गवारी, पोलीस कर्मचारी अनंत यादव, सुनील शिरसाठ, नितीन लोंढे, मारुती करचुंडे, भगवंता मुठे, महेश बारकुले, दीपक साबळे, विष्णू भारती, अमोल शिंदे, अनिल महाजन, गणेश कारोटे, राजेश कोकाटे, मारोतराव जाधव, योगेश तिडके, वैष्णवी गावडे, सोनाली माने, योगिनी कचरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.