गुणवत्तावाढीवर भर देणार : नितीन काळजे
By admin | Published: May 30, 2017 02:41 AM2017-05-30T02:41:22+5:302017-05-30T02:41:22+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि त्यांची गुणवत्ता वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना महापौर नितीन काळजे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या आहेत.
महापालिका भवनात महापौरांनी शिक्षण मंडळाची आढावा बैठक घेतली. महापौर दालनात झालेल्या बैठकीला सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, शिक्षणाधिकारी बी. एस. आवारी, सहायक प्रशासन अधिकारी पराग मुंढे आदी उपस्थित होते. याविषयी माहिती देताना महापौर म्हणाले, ‘‘महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी शालेय साहित्य, गणवेश देण्यात यावे. ज्या शाळेत शिक्षक कमी आहेत. तिथे तासिकेवर शिक्षक घेण्यात यावेत. खरोखरच पासची गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मोफत पास देण्यात यावेत. शाळेत इंग्रजी माध्यम सुरू करण्यात यावे. ई-लर्निंग उपक्रम सुरू करावा. विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांचा विकास करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत. महापालिकेच्या माध्यमिक शाळा खासगी संस्थाना चालविण्यासाठी देण्याचा विचार सुरू आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे वेळीच नियोजन करावे. जेणेकरून विद्यार्थ्यांना देण्यात येणारी रक्कम त्यांना पुढील शिक्षणासाठी उपयोगी पडेल.’’
पुरस्कार योग्य व्यक्तींनाच मिळावा
महापौर म्हणाले, ‘‘चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात यावेत. पुरस्कारासाठी पदाधिकारी, नगरसेवकांच्या शिफारसी योग्य नसतील तर त्या स्वीकारू नयेत. आदर्श शिक्षक पुरस्कार निवडण्यासाठी एक समिती नेमावी. त्या समितीने त्यांच्या कार्याची माहिती घ्यावी आणि चांगली कामगिरी करणाऱ्यांनाच आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात यावा.’’