पिंपरीत भाजपने मैदान मारलं; स्थायी समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा दारुण पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 01:17 PM2021-03-05T13:17:25+5:302021-03-05T19:43:21+5:30
पुणे महापालिकेची शिक्षण समिती आणि पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीवेळी सोशल डिस्टनसिंगचा पूर्ण फज्जा उडालेला पाहायला मिळाला.
पिंपरी : महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शुक्रवारी निवडणूक झाली. त्यात भोसरीचे आमदार महेश लांडगे समर्थक नगरसेवक अॅड नितीन लांडगे यांनी पाच विरूद्ध दहा मतांनी राष्टÑवादी काँग्रेसचे प्रवीण भालेकर यांचा पराभव केला. तर अध्यक्षपदासाठी डावलल्याने भाजपचे रवी लांडगे हे निवडणूकीस अनुपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपाकडून अॅड. नितीन लांडगे यांनी तर राष्टवादी काँग्रेसकडून प्रवीण भालेकर यांनी अर्ज दाखल केला होता. तर रवी लांडगे यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. निवडणूकीत राष्ट्रवादीने उडी घेतल्याने निवडणूकीत चुरस वाढली होती. तर 'सांगली पॅटर्न' राबविण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार याबाबत महापालिका वर्तुळात चर्चा रंगली होती.
महापालिका भवनातील तिसºया मजल्यावरील स्थायी समिती सभागृहात निवडणूकीचे कामकाज सुरू झाले. यावेळी पिठासीन प्राधिकारी तथा नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर होते. अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी निवडणूकीची प्रक्रिया समजावून सांगितली. पिठासीन प्राधिकारी यांनी अर्जांची छाननी करून दोनही उमेदवारांचे अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी दिलेल्या १५ मिनिटांच्या अवधीमध्ये कोणीही उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे हात वर करून मतदान घेण्यात आले. यामध्ये अॅड. लांडगे यांना उपस्थित एकूण १५ सदस्यांपैकी १० सदस्यांची मते मिळाली तर प्रविण भालेकर यांना ५ सदस्यांची मते प्राप्त झाली. समितीचे मावळते सभापती संतोष लोंढे यांच्यासह आयुक्त राजेश पाटील, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी लांडगे यांचे अभिनंदन केले.
स्थायी समिती सदस्य शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भिमाबाई फुगे, पोर्णिमा सोनावणे, सुलक्षणा धर, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे, राजू बनसोडे, मीनल यादव, नीता पाडाळे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, कायदा सल्लागार तथा उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर आदी उपस्थित होते.
.........................................
सत्ताधाऱ्यांची शिष्टाई
नितीन लांडगे हे माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचे चिरंजिव आहे, त्यामुळे निवडणूक बिनविरोध करावी, अशीमहापौर उषा ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, माजी स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी राष्टÑवादी आणि शिवसेनेस घातली. मात्र, निवडणूक लढविण्यावर विरोधक ठाम असल्याने सत्ताधाºयांची शिष्टाई अयशस्वी ठरली.
.....................
सत्त्ताधारी भाजपच्या राज्यस्तरीय आणि शहरपातळीवरील नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला. त्यामुळे मी निवडणूकीत विजयी झालो. शहर विकासासाठी योगदान देणार आहे.
अॅड. नितीन लांडगे, नवनिर्वाचित अध्यक्ष, स्थायी समिती
.......................
स्थायी समिती अध्यक्ष ओळख
अॅड लांडगे हे विधीज्ञ असून बी. कॉम एलएलबीपर्यंत शिक्षण घेतले असून २०१२, २०१७ मध्ये निवडूण आले आहेत. प्रथम महापौर आणि आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचे ते चिरंजिव आहेत. पवना सहकारी बँक आणि पिंपरी-चिंचवड पॉलीटेक्नीकच्या माध्यमातून शिक्षण आणि सहकार क्षेत्रात काम करीत आहेत.
.........................
स्थायी समिती निवडणूकीच्या वेळी फिजिकल डिस्टन्सचे तीन तेरा
पिंपरी : स्थायी समिती निवडणूक महापालिका भवनात झाली. कोरोनाच्या पाश्वभूमीवर पाच पेक्षा अधिक नागरिक एकत्र जमण्यास प्रतिबंध असताना तिसऱ्या मजल्यावर दोनशेहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावरून फिजिकल डिस्टन्सचे तीन तेरा वाजल्याचे दिसून आले.
स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक तिसऱ्या मजल्यावर दुपारी बाराला सुरू झाली. यावेळी दालनाबाहेर तसेच महापौर, उपमहापौर, सत्तारूढ पक्षनेते, विरोधीपक्षनेते दालनात कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. महापालिका भवनात मास्कविना येणाऱ्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र, निवडणुकीच्यावेळी मोठ्या प्रमाणावर विनामास्कचे कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच पाच पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास प्रतिबंध केला असताना तिसºया मजल्यावर दीडशेहून अधिक कार्यकर्ते समर्थक उपस्थित होते. त्यामुळे फिजिकल डिटन्सचे तीनतेरा वाजले होते. महापौरांनी मास्क घातला नाही म्हणून पोलीसांनी कारवाई केली. आता निवडणूकीच्या वेळी विनामास्क आणि गर्दी करणाºयांवर आयुक्त कोणती कारवाई करणार? याकडे लक्ष लागले आहे.