निगडीतील अपघात नव्हे घातपात, दोन संशयित आरोपी ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 04:00 PM2017-08-21T16:00:47+5:302017-08-21T16:00:52+5:30
दोन दिवसांपूर्वी निगडी उड्डानपुलावर शंकर झेंडे यांचा अपघाती मृत्यू झाला अशी पोलिसांकडे नोंद झाली. परंतू झेंडे यांचा अपघाती मृत्यू नसून खून झाला असल्याची तक्रार झेंडे यांच्या कुटूंबियांनी दिली होती.
पिंपरी, दि. 21 : दोन दिवसांपूर्वी निगडी उड्डानपुलावर शंकर झेंडे यांचा अपघाती मृत्यू झाला अशी पोलिसांकडे नोंद झाली. परंतू झेंडे यांचा अपघाती मृत्यू नसून खून झाला असल्याची तक्रार झेंडे यांच्या कुटूंबियांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता, दोन संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आझाद शेखलाल मुलानी (वय२६ रा. चिखली),सहदेव मारुती सोळंकी (वय २६ रा.त्रिवेणीनगर ) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. मुलानी याचा झेंडे यांच्याशी आर्थिक व्यवहार झाला होता. तर सोळंकी याला झेंडे यांनी कामावरून कमी केले होते. या रागातून त्यांनी हे कृत्य केले असावे, असे पोलिसांना प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
याबाबतची माहिती अशी, शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास शंकर किसन झेंडे चिंचवड येथील हॉटेल बंद करून बापूजी मंदिराशेजारी निगडी येथे घरी जात होते. निगडीतील उड्डानपूलावर थोडे अंतर पुढे जाऊन त्यांची दुचाकी बाजुला पडल्याचे दिसून आले. त्यांना शरिरावर कोठेही जखमा नव्हत्या. दुचाकीचेही कसलेच नुकसान झाले नव्हते. दुचाकीचे नुकसान नाही, हाता, पायाला जखम नसताना, डोक्याला पाठीमागे मार बसल्याचे दिसून आले. प्रथम दर्शनी तो अपघात असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, शनिवारी शंकर झेंडे यांची आई व भावाने तो अपघात नसून खून असल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुलानी याचा पैशाचा व्यवहार तर सोळंकी याला नोकरीवरून काढून टाकल्याच्या रागातून हा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.