पिंपरीत डॉक्टरांना शिवीगाळप्रकरणी भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 09:49 PM2020-07-28T21:49:09+5:302020-07-28T21:53:09+5:30
वायसीएमच्या सुरक्षा रक्षकाने तक्रार देऊनही चोवीस तास उलटूनही पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.
पिंपरी : शहरातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टरांना शिवीगाळ आणि मारहाणप्रकरणी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. वायसीएमच्या सुरक्षा रक्षकाने तक्रार देऊनही चोवीस तास उलटूनही पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही.
महापालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण रुग्णालय कोविड समर्पित केले आहे. रविवारी रात्री ११.३० च्या दरम्यान भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केलेल्या शिवीगाळप्रकरणी सुरक्षारक्षक उमेश सरोदे यांनी पिंपरी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. रविवारी रात्री नगरसेवक वाघेरे हे रुग्णालयात आले होते. त्यावेळी ते रुग्णाच्या नातेवाइकांबरोबर वॉर्ड क्रमांक ५०२ मध्ये गेले. त्यानंतर थोड्या वेळाने सिक्युरिटी विभागात एका डॉक्टरांनी दूरध्वनी केला आणि वॉर्डमध्ये एक नगरसेवक वादावादी आणि शिवीगाळ करीत आहेत, अशी माहिती दिली. त्यानंतर सुरक्षारक्षक वॉर्ड क्रमांक ५०२ मध्ये गेले. त्यावेळीही वादावादी सुरू होती. त्यामध्ये सुरक्षारक्षकांनी डॉक्टरांशी वादावादी करणाºया नगरसेवक आणि नातेवाइकांना वॉर्डच्या बाहेर आणले. त्यानंतर प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्या सुरक्षारक्षकांनी पिंपरी पोलिसांना तक्रार अर्ज दिला आहे.
या घटनेनंतर सोमवारी सकाळी वायसीएममधील डॉक्टर आणि परिचारिकांनी मारहाण आणि शिवीगाळीच्या विरोधात आंदोलन केले होते. शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या नगरसेवकावर गुन्हा करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार यांनी वायसीएमला भेट देऊन डॉक्टरांची समजूत काढली होती. त्यानंतर रुग्णालय प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. त्यावेळी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनास दिल्या. त्यानंतर वायसीएमच्या सुरक्षारक्षकांनी २७ जुलैला सायंकाळी पावणेपाचला पोलिसांना तक्रार अर्ज दिला आहे. मात्र, चोवीस तासांनंतर देखील पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही.
पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे म्हणाले,‘‘वायसीएममधील प्रकाराबाबत अद्याप पोलिसांत कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतर कायदेशीर कारवाई करू.’’