कालबाह्य गोष्टींवर शैक्षणिक धोरण नको

By admin | Published: March 24, 2017 04:03 AM2017-03-24T04:03:12+5:302017-03-24T04:03:12+5:30

पुढील काही वर्षांत प्रत्येक लहान-मोठी गोष्ट संगणकीय प्रणालीच्या आधारेच होणार आहे. शैक्षणिक धोरण आखताना गृहित धरलेल्या आधारभूत गोष्टी कालबाह्य झाल्या

No educational policy on deadlines | कालबाह्य गोष्टींवर शैक्षणिक धोरण नको

कालबाह्य गोष्टींवर शैक्षणिक धोरण नको

Next

पुढील काही वर्षांत प्रत्येक लहान-मोठी गोष्ट संगणकीय प्रणालीच्या आधारेच होणार आहे. शैक्षणिक धोरण आखताना गृहित धरलेल्या आधारभूत गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे केवळ खडू, फळा आणि पाठ्यपुस्तकांचा विचार करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करणे योग्य ठरणार नाही. तसेच सामाजिक हितासाठी बालवाडीपासून ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणाचे धडे देण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
इनामदार म्हणाले, भारतीय शिक्षणव्यवस्थेचा विचार केला तर अनेक कालबाह्य झालेल्या गोष्टींवरच चर्चा केली जात आहे. तब्बल ३० वर्षांनंतर देशाचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानामुळे बदलणाऱ्या जीवन पद्धतीत, औद्योगिक क्रांतीमुळे उपलब्ध होणाऱ्या सोई-सुविधा यांचा विचार शैक्षणिक धोरण तयार करताना केला गेला पाहिजे. शिक्षण क्षेत्रात सध्या वापरली जाणारी अनेक साधने कालबाह्य झाली आहेत. मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे जगभरातील ज्ञान विद्यार्थ्यांना त्यांच्या हातात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पुढील काळात विद्यार्थ्यांना वर्गात बसून शिक्षण घेण्याची आवश्यकता भासणार नाही. विद्यार्थी इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षकांकडून विविध विषय घरातच बसून समजून घेणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञानावरील शिक्षण घेणार नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे.
गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी अनेक गोष्टींची माहिती मोबाईलवर घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना संगणक व इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाने खर्च करणे गरजेचे आहे. तसेच शासनाने के. जी. पासून ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रीत करावे. कारण, या वयातच विद्यार्थी अधिकाधिक गोष्टी सजगपणे आत्मसात करतात, असे नमूद करून इनामदार म्हणाले, प्रत्येकाला कायद्याचे राज्य हवे असते. मात्र, कायदा हातात घेण्याची आणि कायदा न मानण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. प्रत्येकाने कायद्याचे व वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे. या गोष्टी शालेय स्तरापासूनच शिकविण्यास सुरूवात केली तर विद्यार्थी त्या लक्षात ठेवतात.
शाळेमध्ये हात कसे धुवावेत, दात कसे घासावेत, वडीलधाऱ्यांचा आदर करावा आदी गोष्टींचे ज्ञान दिले जात नाही. शाळांकडून विद्यार्थ्यांना केल्या जाणाऱ्या मार्गदर्शनामध्ये सामाजिक आणि नैतिक शिक्षणाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये मूल्यशिक्षणाचे धडे देण्याची गरज आहे, असे स्पष्ट करून इनामदार म्हणाले, राजकीय नेत्यांकडून मराठी भाषेचा आग्रह धरला जातो. मात्र, पुढील काळात इंग्रजी भाषेशिवाय पर्याय उरणार नाही. तसेच गुजराती, उर्दू आदी शाळा कालांतराने बंद होतील. त्यामुळे मातृभाषेबरोबरच बालवाडीपासून सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक भाषांचे शिक्षण देण्याची आवश्यकता आहे.
ड्रायव्हरलेस कार, मनुष्यविरहित टोलनाका आदी बदल होताना दिसतात. त्यामुळे समाजाला १०० टक्के संगणक साक्षर करण्याची आवश्यकता आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी संगणकावर आधारित कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध करून द्यावेत, असेही त्यांनी सांगितले.
मूल्यशिक्षणाच्या अभावामुळे नागरिकांकडून कचरा कोठेही फेकला जातो. अनेक नागरिकांना राहण्यासाठी पक्का निवारा नाही. दोन घरांच्या भिंतीमध्ये केवळ एक पत्रा असणाऱ्या वसाहतीमध्ये अनेक नागरिक राहतात, अशा वातावरणातील लहान मुलांवर कोणते संस्कार होणार आहेत? त्यांना घराच्यांकडून मूल्यशिक्षणाचे शिक्षण मिळणार? याचा विचार केला पाहिजे. सुशिक्षित समाजाच्या निर्मितीसाठी सर्व शाळांमध्ये गुणवंत व प्रशिक्षित शिक्षकांची नियुक्ती करण्याची आणि त्यांच्या मदतीने सामाजिक व नैतिक शिक्षण बंधनकारक करण्याची आवश्यकता आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Web Title: No educational policy on deadlines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.