घरात खायला अन्न नाही अन् दारूवर खर्च; मद्यपींच्या कुटुंबात अत्यंत बिकट परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 11:59 AM2023-04-18T11:59:08+5:302023-04-18T11:59:23+5:30
तळीरामांनी कोट्यवधी रुपयांची दारू वर्षभरात रिचवली; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा विक्रमी महसूल
पिंपरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाला गेल्या आर्थिक वर्षात २२०० कोटींचा महसूल प्राप्त झाला. मद्यविक्री व खरेदी परवाना, तसेच इतर माध्यमातून हा महसूल वसूल केला जातो. त्यामुळे मद्यपानाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. यात काही जणांना व्यसनांच्या आहारी गेले. परिणामी त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होऊन संसाराची राखरांगोळी झाली. मद्यावर पैसे खर्च केले मात्र, घरात खायला अन्न नाही, अशी परिस्थिती अनेक मद्यपींच्या कुटुंबात आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान विक्रमी महसूल वसूल केला आहे. दारूमुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे अनेक घटनांवरून समोर आले. तळीरामांनी कोट्यवधी रुपयांची दारू वर्षभरात रिचवली. यात देशी, विदेशी दारू, बिअर तसेच वाईनला देखील मोठी पसंती दिल्याचे दिसून येते.
मद्यापासून दूरच राहिलेले बरे
अतिप्रमाणात मद्यसेवन केल्यास माणूस आहारी जातो आणि आनंदी जीवन हिरावून बसतो. त्यामुळे मद्यापासून दूरच राहिलेले बरे. मद्याच्या आहारी गेलेल्यांसाठी ही उपचार पद्धती आहेत. त्यासाठी निर्व्यसनी व्यक्तीची मानसिकता निर्माण करावी लागते. - डॉ. मनजित संत्रे, मानसोपचार तज्ज्ञ, वायसीएम रुग्णालय, पिंपरी
दारुसाठी कायपण!
व्यसनी मुलाकडून आईचा खून
दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाने आईचा खून केल्याचा प्रकार मार्च २०२३ मध्ये पिंपरी येथे घडला. सकाळी उशिरापर्यंत झाेपलेल्या व्यसनी तरुणाला त्याच्या आईने विचारणा केली. कामावर का जात नाही, असे आईने विचारले. त्याचा राग येऊन मुलाने सिमेंटचा गट्टूने मारहाण केली. यात जखमी झालेल्या आईचा मृत्यू झाला.
मद्यपीचा रुग्णालयात राडा
रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या कारणावरून मृत व्यक्तीच्या एका नातेवाईकाने दारूच्या नशेत रुग्णालयात तोडफोड केली. देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सप्टेंबर २०२१ मध्ये ही घटना घडली होती.
घरातील भांडी विकून मद्यपान
दारूसाठी पैसे पाहिजेत म्हणून काही मद्यपींनी घरातील भांडी, तसेच घरगुती वस्तू विकल्याचे ही प्रकार समोर येतात. दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण केल्याचेही प्रकार घडले. याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
अल्कोहोलचे आरोग्यावर काय दुष्परिणाम होतो?
- उच्च रक्तदाब
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने हायपरटेन्शनचा (उच्च दाबाचा) त्रास होतो.
- हृदयरोग
हृद्याचे स्नायू अधिक कमकुवत होतात. त्यामुळे हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो.
- यकृत कर्करोग
दीर्घकाळ मद्यपानामुळे लिव्हरचा (यकृत) सिराॅयसीस किंवा कर्करोग होण्याची शक्यता असते.