आरक्षणास विरोध करणाऱ्यांना सुट्टी नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा
By विश्वास मोरे | Published: April 7, 2024 02:56 PM2024-04-07T14:56:47+5:302024-04-07T14:57:20+5:30
कोणाच्याही सभेला जायचं नाही कोणाचाही प्रचार करायचा नाही, मुलाबाळांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवा - जरांगे पाटील
पिंपरी: पुढील दोन महिने आपल्याकडे पोळा आहे. तो कसला सर्वांना माहित आहे. आरक्षणास विरोध करणाऱ्यांना आता सुट्टी नाही. पोळा सुरु झालाय भुलून जाऊ नका. कोणाच्याही सभेला जायचं नाही कोणाचाही प्रचार करायचा नाही. मुलाबाळांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवा. जो आपल्या मुलांचा तो तो आपला, असे परखड मत मराठा समाजाचे नेते मनोज रंगे पाटील यांनी रुपीनगर तळवडे येथे व्यक्त केले.
रुपीनगर तळवडे येथील मराठवाडा युवा मंच अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे. रविवारी सकाळी साडे दहाला त मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. तळवडे कडून रुपीनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावरून ज्योतिबानगरपर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
जरांगे पाटील म्हणाले, आजचे व्यासपीठ हे वारकरी संप्रदायाचे व्यासपीठ आहे. त्यामुळे आज या व्यासपीठावर मी कोणत्या जाती धर्माचं बोलणार नाही. खरे तर, हा देहू आळंदीचा परिसर हा पवित्र परिसर आहे. या ठिकाणी मला बोलावलं त्याबद्दल सर्वांचे आभार. वारकरी संप्रदाय हा असा एकमेव सांप्रदाय आहे की त्या संप्रदायामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन वाटचाल करत असतात. त्यामुळे आज मी एका जातीचं बोलणार नाही. सर्वधर्मसमभावाचा मूलमंत्र वारकरी संप्रदायाने दिला आहे. वारकरी संप्रदायाचा आहे. मलाही वारकरी संप्रदायाचा अभिमान आहे तसेच हिंदू धर्माचा गर्व आणि अभिमान आहे. गरिबांच्या गोरगरिबांच्या लेकरांच्या चेहऱ्यावर हास्य आनंद आणण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे सर्वांनी एकजूट राहू द्या. वारकरी संप्रदायातील सर्व महाराज किर्तन प्रवचनांमधून आपली भूमिका मांडत आहेत. पाठीशी आहेत. त्यामुळे आपण कोणालाही घाबरण्याचं कारण नाही समाजात एकजूट ठेवा.''
दुसऱ्या व्यासपीठावर बोलवा मग सांगतो कोण आडवा येते ते?
जरांगे पाटील म्हणाले, हे धार्मिक व्यासपीठ आहे. त्यामुळे या ठिकाणी मी इतर कोणतीही गोष्ट बोलणार नाही. इतर ठिकाणी मला बोलवा.मग मी आरक्षण काय आहे, कसे आहे, कोण कोण आडवं येत आहे आणि त्यांना कसं नीट करायचं हे सगळे सांगतो. मी अन्याय विरुद्ध लढत आहे. भक्ती आणि शक्तीचा संगम या ठिकाणी आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकजुटीने काम करायचं आहे.
दोन महिने पोळा, नादी लागू नका
जरांगे पाटील निवडणुकीच्या अनुषंगाने म्हणाले, पोळा सुरू झाला आहे. तुमच्याकडेही असेल दोन महिने कुणाच्याही नादी लागू नका. भूलून जाऊ नका, तुमच्या डोक्यात रक्तात एकच विषय असला पाहिजे तो म्हणजे आरक्षणाचा. एकजूट अशीच ठेवा कोणाच्याही सभेला जाऊ नका. कोणाचाही प्रचार करू नका, जो आरक्षणाच्या बाजूने असेल तो आपला. इतरांचा विचार करण्याची गरज नाही.''