पोलिसांना ना घर, ना घराचा भत्ता; पडक्या क्वार्टर्समध्ये कुटुंबीयांचा जीव धोक्यात?
By नारायण बडगुजर | Published: April 6, 2023 07:25 PM2023-04-06T19:25:03+5:302023-04-06T19:25:28+5:30
पोलीस म्हणतात, पडक्या क्वार्टर्समध्ये बायको-लेकरांचा जीव धोक्यात कोण घालेल?
नारायण बडगुजर
पिंपरी : शहरवासीयांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस ‘ऑन ड्यूटी’ असलेले पोलीस घरातच असुरक्षित असल्याचे दिसून येते. पिंपरी पोलीस ठाण्याच्या वसाहतीमधील इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे येथील कुटुंबांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भाडेतत्त्वारील घरांमध्ये रहायला जायचे असले तरी घर भाडे भत्ता मिळत नाही. त्यामुळे या पोलिसांची दुहेरी कोंडी होत आहे. दुरवस्थेत असलेल्या इमारतींमुळे बायका -पोरांचा जीव कोण धोक्यात घालेले, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र, पर्याय नसल्याने या वसाहतीत रहावे लागत असल्याचे पोलीस कुटुंबियांनी सांगितले.
शहरातील पहिले पोलीस ठाणे असलेल्या पिंपरी पोलीस ठाण्याला लागून १९८५ ते १९९० या कालावधीत पोलीस वसाहत उभारण्यात आली. यात उपनिरीक्षकांसाठी सहा सदनिकांची एक इमारत आहे. कर्मचाऱ्यांसाठी ९६ सदनिकांच्या तीन इमारती आहेत. यात स्वयंपाक खोलीसह दोन खोल्यांची (वन आरके) सदनिका आहेत. या वसाहतीला ३५ वर्षे झाल्याने इमारती राहण्यास योग्य नाहीत, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
शहरात पोलीस वसाहतीत ८०९ घरे
पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी येथे १०२, भोसरीतील इंद्रायणीनगर येथे १८४ तर वाकड येथील कावेरीनगर येथे ५२३ घरे पोलिसांसाठी आहेत. यासह चाकण येथे देखील पोलीस वसाहत आहे. मात्र, तेथील घरे जीर्ण होऊन त्यांची पडझड झाली आहे. त्यामुळे या वसाहतीत पोलीस वास्तव्यास नाहीत. तसेच देहूरोड येथे पोलीस वसाहत आहे.
निम्मी घरे रिकामीच
पिंपरी वसाहतीमध्ये सध्या २० ते २२ कुटुंबे वास्तव्यास आहेत. तसेच वाकड वसाहतीमधील २०० तर इंद्रायणीनगर वसाहतीमधील ११९ घरे रिकामी आहेत. या घरांमध्ये राहण्यास पोलीस कुटुंब अनुत्सुक आहेत. त्यामुळे वसाहतींमधील निम्मी घरे वापरावीना आहेत.
जीव मुठीत घेऊन आम्ही जगतोय
पिंपरी वसाहतीमधील पोलीस कुटुंबियांशी संवाद साधला असता त्यांनी समस्यांचा पाढाच वाचला. शहरातील मध्यवर्ती ठिकाण आहे. कित्येक वर्षांपासून येथे वास्तव्यास आहे. येथून दुसऱ्या वसाहतीत राहण्यास जाणे परवडणारे नाही. मुलांचे शिक्षण सुरू आहे. त्यांना अपडाऊन करता येणार नाही. त्यामुळे राहण्यास योग्य नसलेल्या या इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन रहात आहोत, असे त्यांनी सांगितले.
घर नको अन् भत्ताही नको
शहर पोलीस दलातील शेकडो पोलिसांची कुटुंबे भाडेतत्त्वावरील घरांमध्ये वास्तव्यास आहेत. पोलीस वसाहतीमधील घर केवळ दोन खोल्यांचे असणे, पाण्याची समस्या, तुटलेली तावदाने, छत व भिंतींचे उखडलेले प्लास्टर, अशा अनेक समस्या आहेत. तसेच पावसाळ्यात गळती होणे अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे पोलिसांची अनेक कुटुंबे सुरक्षित आणि चांगल्या सोसायट्यांमध्ये राहणे पसंती करतात. वसाहतीमधील घरही नको अन् भत्ताही नको, अशी त्यांची भूमिका दिसून येते.
वसाहती फुल्ल झाल्यानंतर मिळणार भत्ता
शहरातील पोलीस वसाहतींमधील पडून असलेल्या सर्वच घरांमध्ये पोलीस कुटुंबांनी वास्तव्य करावे. त्यानंतर वसाहतींमध्ये घर शिल्लक न राहिल्यामुळे उर्वरित पोलिसांना घरभाडे भत्ता देण्यात येईल, अशी प्रशासनाकडून सांगण्यात येते.
पाणी सांडले तरी गळती होते
पिंपरी येथील पोलीस वसाहतीमधील इमारतीत पहिल्या मजल्यावर पाणी सांडले तरी स्लॅबमधून गळती होते. फरशी पुसतानाही पाण्याची गळती होऊन खालच्या मजल्यावर पाणी साचते. इमारतीत काही खोल्या बंद असून, जळमटे, तुटलेल्या वायरी, धूळ, कचरा साखला आहे. तसेच काही तुटलेले दरवाजे, लाकूड असे देखील येथे पडून आहे. इमारतीच्या समोरील लहान मुलांची खेळणी देखील तुटलेली आहे. साफसफाई अभावी इमारतीची दुरवस्था झाल्याचे पोलीस कुटुंबियांनी सांगितले.