सणासुदीत एटीएममध्ये खडखडाट, कामशेत-आंदर-पवन मावळातील ग्राहकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 01:25 AM2018-11-10T01:25:24+5:302018-11-10T01:25:56+5:30
गेल्या काही महिन्यांपासून कामशेतमधील एटीएम सुविधा पूर्णपणे विस्कळीत झाली असून, त्याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे.
कामशेत - गेल्या काही महिन्यांपासून कामशेतमधील एटीएम सुविधा पूर्णपणे विस्कळीत झाली असून, त्याचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. ऐन दिवाळीत बहुतेक एटीएम बंद असल्याने खातेदारांना बँकेच्या लांबच लांब रांगेमध्ये उभे राहण्याची वेळ आली आहे. त्यातही अनेक बँकांचे सर्व्हर डाऊन झाले आहेत. सलग सुटीमुळे बँका बंद राहणार असल्याने अनेक जण पैसे काढण्यासाठी एटीएमकडे धाव घेत आहेत. मात्र, येथील सर्वच एटीएम केंद्रांमध्ये खडखडाट झाल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत. सर्वच बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी खातेदारांची लगबग होती. बँका खातेदारांनी फुलून गेल्या होत्या. बँकांच्या बाहेरपर्यंत रांग लागली होती.
अनेक जण एटीएममध्ये जाऊन नाइलाजाने परत रांगेत उभे राहत होते. बहुतेक बँकांचा सर्व्हर डाऊन असल्याने कामकाज ठप्प होते. वैतागलेले बँक कर्मचारी व चिडलेले खातेदार यांचे अनेकदा खटके उडू लागले. बँकेत साधारण दोन-एक तास थांबूनही पैसे मिळाले नसल्याने अनेक खातेदारांना सणासुदीची खरेदी करता आली नाही. बहुतेकांना तळेगाव, लोणावळा येथील एटीएम केंद्रांचा आधार घ्यावा लागला.
कामशेत शहरात विविध बँकांची नऊ एटीएम केंद्रे असून गेल्या काही दिवसांपासून ही केंद्रे बंद आहेत. नेहमी २४ तास सेवा देणारी हि एटीएम बंद असल्याने तसेच मावळ सोडून प्रमुख शहरांमध्ये एटीएम सुविधा विना खंडित अहोरात्र सुरु असते पण मावळात ही सुविधा सुरळीत नसते.
ऐन दिवाळीत एटीएम केंद्रांमध्ये खडखडाट असल्याने खातेदारांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.
त्यात महत्त्वाच्या बँकांची एटीएम मशीन कायमच बंद असल्याने या बँकेचे खातेदार मेटाकुटीला आले आहेत. शहरातील बहुतेक एटीएम केंद्रांबाहेर पैसे शिल्लक नसल्याचा बोर्ड नेहमीच टांगलेला असतो. कायमच सर्वच एटीएम सुविधा बंद असतात. खातेदारांना या एटीएममधून दुसऱ्या एटीएम केंद्रामध्ये चकरा मारण्यावरून वाचून पर्याय उरत नाही. पण सर्वच एटीएम केंद्रांवर असाच गलथान कारभार आहे. त्यामुळे खातेदार बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी जातात. मात्र बँकांचा सर्व्हर बंद असल्याचे उत्तर मिळत असल्याने लांबच लांब रांगेत उभे राहून
शेवटी रिकाम्या हाती माघारी फिरण्याची वेळ खातेदारांवर येते. यातूनच बँक अधिकारी कर्मचारी व खातेदार यांच्यात वादावादीचे प्रसंग निर्माण होतात.
कामशेत हे मावळातील प्रमुख शहरांपैकी एक असून, नाणे-आंदर-पवन मावळासह आजूबाजूच्या सुमारे ७० गावांमधील ग्रामस्थ खरेदी वा तत्सम कारणांसाठी शहरात येत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये कामशेत शहरातील बाजारपेठ व या बाजारपेठेत होणाºया मोठमोठ्या उलाढाली लक्षात घेऊन येथे अनेक बँकांनी आपले बस्तान बसवले आहे. कामशेत व आजूबाजूच्या अनेक गावांमधील ग्रामस्थांनी सरकारी बँकांच्या ढिसाळ कारभाराला वैतागून या बँकांमध्ये खाती उघडली. मात्र त्यांचेही व्यवहार व खातेदारांना पुरवण्यात येणाºया सुविधा सरकारी बँकेसारख्या होऊ लागल्याने ग्रामीण भागाला कमी का लेखले जाते, असे बोलले जात आहे.