पिंपरी शहरात नाही एकही खड्डा, प्रशासनाचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 02:00 AM2018-07-13T02:00:17+5:302018-07-13T02:00:29+5:30
दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाने शहरात खड्डे नसल्याचा दावा केला आहे.
पिंपरी : दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाने शहरात खड्डे नसल्याचा दावा केला आहे. तसेच, रस्त्यावर आतापर्यंत पडलेल्या खड्ड्यांपैकी ऐंशी टक्के खड्डे बुजविल्याचे अधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यावर खड्डयांमुळे अपघात घडल्यास प्रशासनाला जबाबदार धरण्याचा इशारा पदाधिकाºयांनी दिला आहे.
गेल्या आठवड्यात रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. मॉन्सूनचे शहरात जोरदार आगमन झाले. त्यानंतर जून महिन्यात काही काळ पावसाने दडी मारली होती. त्यानंतर जुलैमध्ये जोरदार पावसास सुरुवात झाली. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पहिल्या पावसापासून खड्डे पडलेले होते. त्यात चिंचवड स्टेशन येथील अंहिसा चौकातील खड्ड्यामुळे अपघातात एका महिलेला प्राण गमवावा लागला होता. खड्ड्यांमुळे शहरात अपघात होत असतानाही प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवित असल्याचे
सिद्ध होत आहे. शहरात खड्डेच नाहीत असा दावा करीत आहे. याविषयी शहरातील रस्त्यांची ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. त्या वेळी शहरातील बहुतेक भागांतील प्रमुख रस्त्यांवर खड्डेच खड्डे असल्याचे वास्तव समोर आले आहे.
ठेकेदारांना अभय
१रस्त्यावर डांबरीकरण केल्यानंतर तेथील डांबर निघून गेले किंवा खड्डे पडले तर त्यावर महापालिकेने कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, अधिकारी आणि ठेकेदार यांची रिंग असते. तसेच ठेकेदार हे राजकीय पक्षाच्या संदर्भातील लोक आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. तीन वर्षांच्या आत रस्ता खराब झाल्यास संबंधित ठेकेदारांवर कारवाई करणे बंधनकारक आहे. मात्र, अशा प्रकारची कारवाई झाली नसल्याचे दिसून येत आहे. सहा महिन्यांपूर्वी केलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.
दूरसंचारचा भार महापालिकेवर
२गेल्या दोन महिन्यांत शहरात मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदाई सुरू आहे. पावसामुळे ती थांबली असली तरी पावसाळ्यापूर्वी हे खड्डे बुजविणे गरजेचे होते. मात्र, हे खड्डे व्यवस्थितपणे न बुजविल्याने पहिल्याच पावसात रस्त्याचे तीनतेरा वाजले आहेत. रस्ते खोदाईची कामे भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांच्या नातेवाइकांनी हाती घेतली आहेत. त्यामुळे खड्डयांविषयी आवाज उठवायचा कोणी? असा प्रश्न आहे. वास्तविक हे खड्डे दूरसंचार कंपन्यांकडून बुजवून घेणे आवश्यक असताना महापालिकेने यासाठी स्वतंत्र निविदा काढली आहे. महापालिकाच खड्डे बुजवित आहे. एकाही ठेकेदाराला दंड केल्याची माहिती महापालिका दप्तरी नाही.