आपत्कालीन परिस्थितीत ११२ वरून प्रतिसाद नाही; नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 11:20 AM2022-08-09T11:20:42+5:302022-08-09T11:25:02+5:30
काळेवाडी येथील एका फ्लॅटधारकाला तब्बल पाऊणतासानंतर पोलिसांची मदत....
पिंपरी : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी डायल ११२ हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध आहे. त्यावरून किमान १० मिनिटांत प्रतिसाद मिळून संबंधितांपर्यंत मदत पोहोचविण्यात येते, असा दावा केला जातो. मात्र, हा दावा फोल ठरल्याचे वेळोवेळी दिसून आले. काळेवाडी येथील एका फ्लॅटधारकाला तब्बल पाऊणतासानंतर पोलिसांची मदत उपलब्ध झाली. तोपर्यंत संशयित व्यक्ती पसार झाली.
काळेवाडी येथील विजयनगर येथे ३० फ्लॅटच्या एका सोसायटीत सोमवारी (दि. ८) रात्री सव्वादोननंतर दोन संशयित व्यक्तीनी प्रवेश केला. त्यानंतर २ वाजून २७ मिनिटांनी संशयित व्यक्तीनी सोसायटीमधील एका फ्लॅटच्या दरवाजासमोर जाऊन बेल वाजवली. दोन-तीनदा बेल वाजल्याने फ्लॅटधारकाने दरवाजाच्या ‘आयहोल’मधून पाहिले असता, दोन व्यक्ती बाहेर दिसल्या. त्यांनी जाकीट-हुडी घातले होते, तसेच त्यांच्या पाठीवर बॅग असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांचा संशय आल्याने फ्लॅटधारक आणि घरातील इतर व्यक्ती घाबरल्या. संशयित व्यक्तीनी दरवाजाची बेल बराच वेळ वाजवल्याने फ्लॅटधारक भयभीत झाले. त्यानंतर त्यांनी वाकड पोलीस ठाण्याचा ‘लँडलाइन’ क्रमांक डायल केला. मात्र, तो क्रमांक सेवेत नव्हता. त्यानंतर १०० क्रमांक डायल केला. मात्र, त्यावरूनही प्रतिसाद मिळाला नाही. इमर्जन्सी म्हणून ११२ या क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. या हेल्पलाइनवर तीन मिनिटे बोलून फ्लॅटधारकाने मदतीची विनंती केली. पोलीस लगेचच येतील, असे हेल्पलाइनवरून सांगण्यात आले. मात्र, त्यानंतरही ११२ हेल्पलाइनवाले पोलीस पोहोचले नाहीत.
दरम्यान, वाकड पोलीस ठाण्याच्या दुसऱ्या एका लँडलाइन क्रमांकावर संपर्क साधला असता, रात्र गस्तीवरील पोलिसांचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला. पहाटे तीनच्या सुमारास गस्तीवरील पोलिसांसोबत बोलणे झाले. मदतीसाठी लवकर येण्याची विनंती फ्लॅटधारकाने केली. त्यानंतर ३ वाजून ३६ मिनिटांनी गस्तीवरील पोलीस फ्लॅटधारकाच्या सोसायटीत दाखल झाले. दरम्यान, संशयित व्यक्ती सोसायटीतून पसार झाल्या होत्या. सोसायटीत, तसेच परिसरात त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते मिळून आले नाहीत.
नागरिकांमध्ये घबराट
सोसायटीतील इतर फ्लॅटमधील सर्व जण गाढ झोपेत असताना दोन अनोळखी संशयित व्यक्ती दरवाजाची बेल वाजवत असल्याच्या या प्रकाराबाबत परिसरात चर्चा झाली. त्यामुळे सोसायटीतील, तसेच परिसरातील नागरिकांमध्ये घबराट आहे. त्यात पोलिसांची मदत वेळेत मिळू न शकल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
‘त्या’ संशयित व्यक्ती कोण?
रात्री घराबाहेर आलेल्या त्या संशयित व्यक्ती कोण होत्या, याबाबत सांगता येत नाही. त्यांनी जॅकेट-हुडी घातल्याने त्यांचे चेहरे दिसून येत नव्हते. चोरी किंवा लुटमारीच्या उद्देशाने ते आले असावेत, अशी भीती वाटल्यानेच पोलिसांकडून मदतीची मागणी केली होती, असे फ्लॅटधारकाने सांगितले.
स्थानिक पोलिसांच्या मदतीसाठी मुंबईला ‘काॅल’
डायल ११२ या हेल्पलाईन क्रमांकावरून काॅल मुंबई येथील मुख्य केंद्रावर जातो. तेथे तक्रार ऐकून घेऊन त्यानुसार शहर पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली जाते. नियंत्रण कक्षाकडून स्थानिक पोलीस ठाण्याच्या ११२ हेल्पलाईनच्या वाहनावरील पोलिसांना याबाबत सूचना दिली जाते. यात मोठा वेळ जातो. परिणामी मदत वेळेत उपलब्ध होत नाही. किमान १० मिनिटांत प्रतिसादाचा दावाही फोल ठरतो.