बागायतीतून नको रिंगरोड, कृती समितीची मागणी : पुणे येथे ‘पीएमआरडीए’सह बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 03:18 AM2017-08-07T03:18:45+5:302017-08-07T03:18:45+5:30
वडगाव मावळ/उर्से : पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित रिंगरोड संदर्भात पुन्हा एकदा पुणे येथे बैठक झाली. बैठकीत सर्व सात गावांतील कृती समितीच्या शेतकऱ्यांची प्रस्तावित रिंगरोड बागायती क्षेत्रामधून न नेता अन्य मार्गांनी वळविण्यात यावा ही मागणी आमदार संजय भेगडे यांनी पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांच्यापुढे मांडली.
मावळ तालुक्यातील शेतकऱ्या च्या जमिनी शासनाने यापूर्वी विविध प्रकल्पांसाठी संपादित केल्या आहेत, असे आमदार भेगडे यांनी अधिकाºयांच्या निदर्शनास आणून देताना बागायती जमिनी वाचल्या पाहिजेत, याबाबत मागणी केली. संत तुकाराम कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांनीही बाधित गावांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊसक्षेत्र असल्याने याचा विपरीत परिणाम कारखान्यावर होणार असल्याचे सांगितले.
बैठकीस माजी आमदार कृष्णराव भेगडे, भारतीय किसान संघाचे अध्यक्ष शंकर शेलार,सभापती गुलाब म्हाळसकर, राजाराम राक्षे, वंदे मातरम् संघटनेचे जनार्दन पायगुडे, भास्कर म्हाळसकर, एकनाथ टिळे, प्रशांत ढोरे, बाळासाहेब घोटकुले, किरण राक्षे, शेतकरी कृती समितीचे सर्व सदस्य, शेतकरी उपस्थित होते.
मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र असणाºया नेरे, सांगावडे, दारूंब्रे, साळुंब्रे, गोडुंब्रे, धामणे, परंदवडी, उर्से या गावातून नियोजित रिंगरोड झाल्यास येथील बागायती क्षेत्र बाधित होणार आहे. येथील शेतीवर किती जणांचे कुटुंब अवलंबून आहे. त्यातून मिळणारे वार्षिक दरडोई उत्पन्न याची माहिती गित्ते यांना समितीने दिली. याबाबतची संपूर्ण माहिती असलेल्या कागदपत्रांसह निवेदन त्यांना देण्यात आले.
बैठकीत प्राधिकरणाच्या वतीने नियोजित रिंगरोडचे सादरीकरण करण्यात आले. पर्यायी मार्ग म्हणून नांदे, मारुंजी, कुसगाव, कासारसाई, पाचाणे, चांदखेड, उर्से या किंवा नांदे, गोडांबेवाडी, रिहे, आढले बु., पारिटेवाडी, उर्से मार्गे करण्यात यावा, असे समितीने सुचविले.
तळेगाव दाभाडे : मुळशी आणि मावळ तालुक्यांतील प्रस्तावित रिंगरोडच्या मार्गावरील संपादित होणारे क्षेत्र बागायती असल्याने केंद्र सरकारने नव्याने केलेल्या भूसंपादनाच्या कायद्यानुसार त्या संपादित करता येणार नसल्याचे माजी आमदार भेगडे यांनी पीएमआरडीएचे आयुक्त किरण गिते यांच्या निदर्शनास बैठकीत आणून दिले. भूसंपादनास शेतकºयांचा तीव्र विरोध होणार आहे. मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र बाधित होत असल्याने रिंगरोडबाबत त्यांनी लेखी हरकत दाखल केली आहे.
याबाबत भेगडे यांनी सांगितले की, प्रस्तावित रिंगरोडचा मार्ग हिंजवडी-मारूंजी-जांबे-नेरे-सांगवडे-दारूंब्रे-गोडुंब्रे-धामणे-परंदवडी-उर्से असा आहे. या गावांमधून प्रस्तावित रिंगरोड गेल्यास मोठ्या प्रमाणावर बागायती क्षेत्र बाधित होणार आहे. त्यात बदल करुन रिंगरोड हिंजवडी-मारूंजी-जांबे-नेरे-कासारसाई-चांदखेड-बेबेडओहळ-उर्से असा केल्यास कायद्याचा अडसर राहणार नाही.
शेतकºयांच्या तक्रारीचे स्वरूपही सौम्य राहील आणि खर्चातही मोठी बचत होईल. कारण हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून, तो ६० मीटर रुंदीचा आहे. त्यामुळे कमीत कमी क्षेत्र भूसंपादित करावे लागून प्रकल्प वेळेतही पूर्ण करता येईल.
रिंगरोड उर्से खिंडीमार्गे वडगाव हद्दीतून तळेगाव एमआयडीसी रोडला आंबी गावाजवळून इंद्रायणी नदीस संलग्न दर्शविला आहे. आंबी, नाणोली, इंदोरी परिसरात सुमारे ५०० एकर क्षेत्र बागायती ऊस पिकाचे आहे. एमआयडीसी-नवलाख उंब्रे रोड आहे. बधलवाडी-मिंडेवाडी ते शिंदे-वासुली हा रस्ता पूर्ण झाल्यास चाकण एमआयडीसीचा रस्ता, शिंदे वासुली सर्कलहून खालुंब्रे-महाळुंगमार्गे निघोज गावास जोडला आहे. त्याचे रिंगरोड रूपांतरीत झाल्यास भूसंपादनाची गरज पडणार नाही, असे भेगडे यांनी म्हटले आहे. भेगडे यांनी सुचविलेले पर्याय शासनाकडे सादर करण्याचे आश्वासन गिते यांनी दिले.