स्मार्ट सिटीतील शाळेत अद्याप नाही स्वच्छतागृह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 01:53 PM2019-07-17T13:53:39+5:302019-07-17T13:55:00+5:30
हगणदरीमुक्त शहर म्हणून महापालिका प्रशासन सर्वत्र गाजावाजा करत आहे.
शीतल मुंडे-
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट सिटीमध्ये निवड झालेली आहे. शहराला स्वच्छतेचे बक्षीस मिळाले आहे. हगणदरीमुक्त शहर म्हणून महापालिका प्रशासन सर्वत्र गाजावाजा करत आहे. मात्र महापालिकेच्या कासारवाडी येथील प्राथमिक शाळेला गेल्या दोन वर्षांपासून स्वच्छतागृह नाही.
त्याचप्रमाणे शाळेची इमारत अतिशय जुनी झालेली आहे. शाळेची छतगळती होत आहे, शाळेला रंगरंगोटीची आवश्यकता आहे. शाळेतील वर्गखोल्यांचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत. यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जात विद्यार्थ्यांना मात्र शिक्षकाचे धडे गिरवावे लागतात.
प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी इतरत्र जावे लागते. शाळेमधील वर्गांची पाहणी केली असता वर्गामध्ये अनेक ठिकाणी भिंतींना पापुडे आलेले आहेत. ठिकठिकाणी वर्गखोल्या गळत आहेत. शाळेतील वर्गखोल्यांना खिडक्यादेखील नाहीत. पाऊस आल्यानंतर वरून गळणारे छत आणि खिडक्यांमधून येणारे पाणी यांच्यापासून संरक्षण करत शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहेत.
शाळेमध्ये संगणक विभाग स्वतंत्र आहे. मात्र संगणक विभागदेखील मोठ्या प्रमाणात गळत असल्यामुळे पावसाच्या पाण्यापासून संगणक वाचवताना शिक्षकांना मात्र तारेवरची कसरत करावी लागते. शाळेचा परिसर छोटा असल्यामुळे खेळण्यासाठी मैदानच नाही.
..........
* शाळेला सांडपाणी मिळत नाही
विद्यार्थ्यांना खिचडी खाण्यासाठी महापालिकेकडून प्लेट देण्यात आलेल्या आहेत. मात्र त्या सर्व प्लेट शाळेमध्ये धूळ खात पडलेल्या आहेत. कारण प्लेट धुण्यासाठी सांडपाणीदेखील शाळेत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना त्या प्लेटचा वापर करता येत नाही. शाळेतील एखाद्या विद्यार्थ्याने शाळेमध्येच शौचालय केले तर साफ करण्यासाठीदेखील शाळेमध्ये पाणी नाही.
* शिक्षण विभाग घेत नाही दखल
कासारवाडीतील शाळेमध्ये मूलभूत सुविधाच नाहीत. याबाबत शाळा प्रशासनाने शिक्षण विभागाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे. तीन ते चार वेळा स्मरणपत्र देखील दिलेली आहेत. मात्र शाळेला शिक्षण विभाग कुठलाच प्रतिसाद देत नसल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे वर्गांमध्ये लाईट, फॅन नाहीत.