'हाताला काम नाही-खायला अन्न नाही' ; कष्टकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वाजवल्या थाळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 06:37 PM2020-10-01T18:37:38+5:302020-10-01T18:38:51+5:30
कष्टकऱ्यांना मोफत धान्य आणि तातडीने पाच हजार रुपयांचा निधी त्यांच्या खात्यावर जमा करावा.
पिंपरी : कोरोनामुळे (कोविड १९) निर्माण झालेल्या स्थितीत अंगमेहनती कष्टकऱ्यांना हाताला काम नाही आणि खायला अन्न नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कष्टकऱ्यांना मोफत धान्य आणि तातडीने पाच हजार रुपयांचा निधी त्यांच्या खात्यावर जमा करावा या मागणीसाठी कष्टकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ताटली वाजवा आंदोलन केले.
कष्टकरी शेत मजूरांच्या हाताला नाहीं काम, ताटात नाहीं अन्न, जगायचं कसं, असा प्रश्न उपस्थित कातून राज्यव्यापी ताटली सत्यागृहाला गुरुवारपासून (दि. १) सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयावर हातात ताटल्या घेवून दगड खाण कामगार, शेत मजूर व घर काम करणारे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रत्येक कामगारांना पाच हजाराचा निधी त्यांच्या खात्यावर जमा करावा. मोफत धान्य पुरवठा करावा आणि त्यांच्यासाठी मोफत भोजन योजना लागू करावी. आरोग्य विमा सुरक्षा कवच घ्यावे अशा मागण्या करण्यात आल्या. कामगारांसाठी बांधकाम कामगार कल्याण निधी, गौण खनिज विकास निधी असतो. कोविड काळामध्ये या निधीचा वापर करावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना देण्यात आले. दगडखाण असंघटित कामगार विकास परिषदेचे ऍड. बी एम रेगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कामगारांच्या प्रश्नांबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी मागण्या सरकारपर्यंत पोचविण्याचे आश्वासन दिले. मागण्या पूर्ण होई पर्यंत सत्याग्रह सुरूच राहणार असल्याचे रेगे यांनी सांगितले. कष्टकरी शेतकरी संघटनेच्या अध्यक्ष पल्लवी रेगे, सत्याग्रहाचे संयोजक सुरेश पवार, आदिनाथ चांदणे, समाधान अहिर, जनाबाई चौगुले, फुलाबाई थोरात, मरिअप्पा चौगुले या वेळी उपस्थित होते.''