रॅलीतून अहिंसेचा संदेश
By admin | Published: April 10, 2017 02:25 AM2017-04-10T02:25:12+5:302017-04-10T02:25:12+5:30
अहिंसा रॅली, रक्तदान शिबिर, नेत्रदान जागृती,शालेय साहित्यवाटप अशा विविध कार्यक्रमांतून अहिंसेचा संदेश
चिंचवड : अहिंसा रॅली, रक्तदान शिबिर, नेत्रदान जागृती,शालेय साहित्यवाटप अशा विविध कार्यक्रमांतून अहिंसेचा संदेश देत पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या माध्यमातून श्री भगवान महावीर जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.
भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातील विविध भागात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण सप्ताह शहरातील जैन बांधवांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. सामाजिक कार्यात अग्रेसर होत जैन महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले. निगडीमधील श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिरात आज रक्तदान शिबिर घेण्यात आले.नेत्रदान जनजागृती व नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले.श्री भगवान महावीर अहिंसा ट्रस्टचे विजय भिलवडे व प्रकाश शेडबाळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
पिंपरी-चिंचवड जैन सोशल ग्रुपच्या वतीने चिंचवडमधील चैतन्य हॉस्पिटलमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये शहरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी, तसेच ग्रुपच्या सभासदांच्या विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या. या शिबिराचे उद्घाटन पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी सहायक पोलीस उपायुक्त वैशाली जाधव,पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे,विवेक मुगळीकर यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जैन सोशल ग्रुपचे राजेंद्र चोरडिया, मोनिका गांधी, संतोष खिंवसरा यांच्यासह सर्व ग्रुपच्या सदस्यांनी योगदान दिले.श्री पार्श्वनाथ दिगंबर ट्रस्ट, पारस भवन यांच्या वतीने चिंचवडमधील गुरुकुलमधील विद्यार्थ्यांना, तसेच पन्नालाल लुंकड वसतिगृह येथे मिठाई व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यासाठी देवेंद्र बाकलीवाल व विजय बाडजात्या यांनी योगदान दिले.
दुपारी चारला सांगवी येथील भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथून अहिंसा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ह्यजीवो और जीने दोह्ण असा संदेश देत अनेक जैन बांधव रॅलीत सहभागी झाले होते.भगवान महावीरांचा जयघोष करीत रॅलीत अनेक युवक,युवती व महिला हातात झेंडे घेऊन सहभागी झाले होते.ट्रस्टचे रामेशलालजी ओसवाल यांच्या हस्ते ध्वज फडकवीत रॅली ला सुरुवात झाली. दापोडी, कासारवाडी,पिंपरी,चिंचवड,आकुर्डी,प्राधिकरणमार्गे निगडीतील जैन मंदिरात रॅलीची सांगता करण्यात आली. जैन महासंघाचे डॉ. अशोक पगारिया, प्रा. प्रकाश कटारिया, सतीश खाबिया, वीरेंद्र जैन, सूर्यकांत मुथियान, सुरेश गादिया, नेनसुख मांडोत, संजय जैन, सुभाष सुराणा, विलास पगारिया, दिलीप भन्साळी, नितीन बेदमुथा, प्रकाश भंडारी, रमेश ओसवाल, अनुप नहार, राजेंद्र तातडिया, अशोक पगारिया यांनी महोत्सवासाठी योगदान दिले.
प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात अहिंसा पुरस्कार व भक्तिसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
अहिंसा पुरस्कार व भक्ति संध्या कार्यक्रम
चिंचवड स्टेशन येथील श्री शांतीनाथ जैन मंदिर व श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ यांच्या वतीने महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सकाळी स्टेशन परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. बँड, बाजाच्या गजरात जयघोष करीत अनेक जैन बांधव यात सहभागी झाले होते. संघाच्या वतीने नाटीकाचे आयोजन करण्यात आले.मंदीर ट्रस्ट च्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
या वेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात ३०जणांनी रक्तदान केले. ट्रस्टचे जितेंद्र जैन,रमेश सोनिगरा, विनोद दोशी, प्रकाश सोनिगरा यांनी योगदान दिले. स्थानक संघाचे शितल गादिया,उज्वला लुंकड,कांचन बोरा,आनंद पगारिया,सुरेश गादिया,संपत खिवंसरा,अशोक बाफना,जयप्रकाश राका कांतीलाल खिवंसरा यांनी योगदान दिले.
जय महावीर, जय महावीरचा जयघोष
जय महावीर, जय महावीर असा जयघोष करीत चिंचवडगावातील जैन बांधवांनी रविवारी भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली. भगवान महावीरांनी दिलेला अहिंसेचा संदेश आचरण करण्याची गरज असल्याचे फलक हातात घेऊन अनेक जैन बांधव या रॅलीत सहभागी झाले होते. श्री श्वेतांबर टेम्पल ट्रस्ट व श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ यांच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
चिंचवडगावातील भगवान महावीर स्वामी मंदिरातून मिरवणुकीला सुरवात झाली.चापेकर चौक,गांधीपेठ,चिंचवड गावठाण परिसरातून पुन्हा मंदिरापर्यंत आल्यानंतर मिरवणुकीची सांगता झाली. या मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी विविध ठिकाणी नागरिक उपस्थित होते.अनेक ठिकाणी शीतपेय, प्रसादाचे वाटप करीत होते.