उद्योजकांची नाहक फरफट, लघुउद्योजक संघटनेची तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 03:21 AM2018-02-01T03:21:24+5:302018-02-01T03:22:05+5:30
पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांनी चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये कारखाना चालू करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी अर्ज केले आहेत. या सर्व उद्योजकांना टप्पा क्रमांक दोनमधील डी-ब्लॉकमधील भूखंड मंजूर केला.
भोसरी : पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांनी चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये कारखाना चालू करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी अर्ज केले आहेत. या सर्व उद्योजकांना टप्पा क्रमांक दोनमधील डी-ब्लॉकमधील भूखंड मंजूर केला. उद्योजकांनी सर्व पैसे भरून जागेचा ताबा घेतला. मात्र, गेल्या चार वर्षांपासून येथील पायाभूत सुविधांचा विकास रखडला असून, यामुळे उद्योजकरांची नाहक फरफट होत असल्याची तक्रार पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील २०१४ मध्ये या सर्व उद्योजकांनी सर्व पैसे भरून या जागेवर करावयाच्या बांधकामाचे नकाशेदेखील मंजूर करून घेतले. मात्र, एमआयडीसीने याठिकाणी वीज, पाणी, मलनिस्सारण अशा मूलभूत सुविधा न पुरविल्यामुळे हे उद्योजक बांधकाम करू शकले नाहीत. या जागेवर उद्योग चालू करण्यासाठी अनेक उद्योजकांनी बँक आणि वित्तीय संस्थाकडून कर्ज काढले.
कर्जाचे हप्ते चालू असून, उद्योग चालू होऊ शकल्यामुळे हे उद्योजक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. याबाबत एमआयडीसी प्रादेशिक अधिकाºयापासून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.
याबाबत एमआयडीसी कार्यालयाकडून माहिती मागविली असता, स्थानिक शेतकरी व प्रकल्पग्रस्त यांनी भूखंड संपादनाचे काम अडवले असल्यामुळे मूलभूत सुविधा पुरविता येत नाहीत, असे उत्तर मिळाले आहे. वास्तविक पाहता एमआयडीसीने या प्रकल्पग्रस्तांना १२़५ टक्के परतावा दिला आहे. परंतु तो त्यांना मान्य नाही.
प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन
उद्योजकांच्या तक्रारीची तत्काळ दाखल घेऊन वरील मूलभूत सुविधा तातडीने पुरवाव्यात, तसेच बांधकाम पूर्णत्वाच्या मुदतीत ३ वर्षांची वाढ द्यावी. तसेच बाधित शेतकरी, उद्योजक, भूसंपादन अधिकारी, अभियांत्रिकी विभाग अधिकारी व प्रादेशिक अधिकारी यांची एकत्रित बैठक प्रत्यक्ष साईटवर आयोजित करून वरील प्रश्न येत्या १५ दिवसांत सोडवावा. अन्यथा एमआयडीसीच्या वाकडेवाडी येथील कार्यालयासमोर पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिला आहे.