अवघडच हाय! देवालाही सोडलं नाही, चक्क मंदिराच्या कळसाची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 02:30 PM2021-07-08T14:30:17+5:302021-07-08T14:30:44+5:30
पिंपळे निलख येथे असलेल्या नवयुग कालिकादेवी मंदिरातील घटना
पिंपरी: संकटात अडकल्यावर माणसाला नेहमीच देवाची आठवण येत असते. कोरोना काळातही मंदिरे बंद असूनही अनेक जण देवाकडे प्रार्थना करत होते. कोरोनाच्या संचारबंदीत बेरोजगारीचे प्रमाण वाढले. त्यामुळे चोऱ्याही वाढू लागल्या. अशा वेळी दुकाने फोडणे, घरफोडी या घटना घडत होत्याच. पण चोरांनी आता देवालाही सोडले नाही. मंदिरांच्या आतील दानपेटीवर त्यांचा डोळा असल्याचे मागील काही घटनांतून दिसून आले.
पण आता तर चक्क मंदिरच्या कळसाची चोरी झाल्याचे समोर आले आहे. पिंपळे निलख येथे असलेल्या नवयुग कालिकादेवी मंदिराच्या कळसाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. मंगळवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली.
सुर्यकांत शंकरआप्पा पांचाळ (वय ४६, रा. वारजे माळवाडी, पुणे) यांनी या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे निलख येथे नवयुग कालिकादेवी मंदिर आहे. अज्ञात चोरट्याने मंदिरात मंगळावारी पहाटे तीन वाजता प्रवेश केला. मंदिरातून चार हजार रुपये किंमतीच्या दोन पितळी कळसांची चोरी केली आहे.