PCMC: पाण्याचा अपव्यय केल्यास पालिका नोटीस बजावणार; पावसाळा लांबल्यास पाण्याची टंचाई
By विश्वास मोरे | Published: March 18, 2024 04:19 PM2024-03-18T16:19:02+5:302024-03-18T16:19:43+5:30
पाणी वाचविले तर पावसाळ्यापर्यंत जुन व जुलैपर्यंत पाणी पुरेसे उपलब्ध होऊ शकेल, असा अंदाज आहे. पाण्याचा अपव्यय केल्यास नोटीस बजाविण्यात येणार आहे....
पिंपरी : उन्हाळा सुरु झालेला आहे. पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. पावसाळा हा विलंबाने सुरु झाल्यास पाण्याची टंचाई शहरात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणी आतापासून नागरिकांनी काटकसरीने व जपून वापरणे अत्यावश्यक आहे. पाण्याचा गैरवापर करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. सध्या धरणात गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा आहे. पाणी वाचविले तर पावसाळ्यापर्यंत जुन व जुलैपर्यंत पाणी पुरेसे उपलब्ध होऊ शकेल, असा अंदाज आहे. पाण्याचा अपव्यय केल्यास नोटीस बजाविण्यात येणार आहे.
काय करू नये-
पिण्याचे पाणी हे वाहने स्वच्छ करणे, बागकाम व कुंड्यासाठी, घर किंवा इमारत व परिसर स्वच्छ करणेसाठी, धुण्यासाठी वापरू नये. तसेच, सर्व सोसायटी धारकांनी एस.टी.पी. आणि बोअरवेल सुस्थितीत ठेवून त्याचे पाणी सदनिकांनामध्ये स्वच्छतागृह, सोसायटी अंतर्गत उद्यान परिसराची स्वच्छता इत्यादींसाठी वापरावे, जेणेकरुन पिण्याच्या पाण्याची बचत होईल. पिण्याच्या पाण्याचा गैरवापर गाड्या धुणे, रस्ते धुणे, घर, सोसायटी परिसर धुणेसाठी पाणी वापरू नये.
ही घ्यावी काळजी
1) पिण्याचे पाणी वाहने स्वच्छ करण्याकरिता वापरु नका.
2) अंगण, जिने किंवा फरशी धुणे टाळा, स्वच्छतेकरिता कमीत कमी पाण्याचा वापर करा.
3) घरातील गळणारे नळ तत्काळ दुरुस्त करुन घ्या.
4) घरासमोरील रस्त्यावर पाणी मारु नका, रस्ते धुवू नका.
5) कुंड्यातील झाडे, बागकामासाठी पिण्याचे पाण्याचा वापर करु नका.
ग्राहकांना गैरवापर होत असल्याबाबत प्रथमतः नोटीस बजाविण्यात येईल. तदनंतरही पुन्हा दुसऱ्यांदा असा पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करताना कोणीही आढळल्यास कोणतीही ऐकूण घेतली जाणार नाही व तत्काळ नळजोड तोडण्यात येईल. नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे व पाण्याची बचत करावी, जेणेकरुन येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी पाणी टंचाई निर्माण होणार नाही.
- शेखर सिंह, आयुक्त