धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीस
By admin | Published: May 28, 2016 04:25 AM2016-05-28T04:25:13+5:302016-05-28T04:25:13+5:30
पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचाच कालावधी शिल्लक असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील १०८ धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीस बजावली आहे.
पिंपरी : पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचाच कालावधी शिल्लक असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील १०८ धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीस बजावली आहे.
पावसाळ्यातील कुठलीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळण्याची भीती असते. अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेकडून दर वर्षी शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले जाते.
तसेच धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटीस बजावली जाते. या वर्षी केलेल्या सर्वेक्षणात १०८ धोकादायक इमारती आढळल्या. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत जास्त प्रमाणात धोकादायक इमारती आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून अतिधोकादायक इमारती रिकाम्या केल्या जातात. जुने बांधकाम, मातीचे तसेच कच्चे बांधकाम याकडे अधिक लक्ष दिले जाते. त्यानुसार महापालिकेने संबंधित इमारतीचा मालकांना पूर्वकल्पना दिली आहे.
(प्रतिनिधी)