आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी थेट पालकांचे बँक खाते तपासणाऱ्या 'त्या ' शाळांना नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 12:07 PM2020-12-04T12:07:50+5:302020-12-04T12:08:28+5:30
महापालिका शिक्षण विभागाने खासगी इंग्रजी शाळांकडे मागितला खुलासा
पिंपरी : खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी पालकांची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी थेट त्यांच्या बँक खात्याची तपासणी केली. अशा तक्रारी पालकांनी महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडे केल्या होत्या. या तक्रारीची दखल शिक्षण विभागाने घेतली आहे. संबधित शाळांना नोटीस पाठवून या प्रकाराचा खुलासा मागितला आहे.
या बरोबरच ज्या शाळा विद्यार्थ्यांकडे शुल्कासाठी तगादा लावत आहेत. शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाइन ग्रुपमधून ब्लॉक करत आहेत, अशा शाळांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.
शहरातील ४० खासगी इंग्रजी शाळांविरोधात शुल्क वसुलीसाठी तगादा लावत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या होत्या. त्यातील २५ शाळांना महापालिकेच्या शिक्षण विभागाने ५३ नोटिसा पाठविल्या आहेत. कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू असतानाही खासगी इंग्रजी शाळांनी पालकांकडे शाळेच्या शुल्कासाठी तगादा लावत आहेत. त्याचबरोबर शाळेचे सर्व प्रकारचे शुल्क भरण्याची सक्ती करण्यात येत आहे. शुल्क कमी करावे, अशी मागणी पालक करत आहेत. त्यावर शाळा पालकांची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी थेट त्यांच्या बँक खात्याची तपासणी करत आहेत. त्याचबरोबर तीन महिन्यांची सॅलरी स्लिप आणून दाखवा, बँकेचे स्टेटमेन्ट आणून द्या, मग तुम्हाला शुल्क कमी करायचे की नाही ठरवू, असे काही शाळांनी सांगितले. अशा तक्रारी प्रामुख्याने पालकांनी केल्या होत्या.
पालकांच्या तक्रारीनुसार महापालिकेने शहरातील खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे खुलासा मागविला आहे. कोणत्या आधारावर शाळेने विद्यार्थ्यांच्या पालकांकडे त्यांच्या बँकेच्या खात्याची माहिती मागविली, याचे स्पष्टीकरण देण्यास शिक्षण विभागाने सांगितले आहे.
--
इंग्रजी शाळांच्या सर्वाधिक तक्रारी
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. ऑनलाइन शिक्षण सरू झाल्यापासून खासगी इंग्रजी शाळांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. काही दिवसांपूर्वी या संदर्भात पालकांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये शुल्क भरले नाही म्हणूून विद्यार्थांचे ऑनलाइन शिक्षण बंद करणे, विद्यार्थांना शुल्काबाबत विचारणा करणे, आदी तक्रारी करण्यात आल्या होत्या.
---
पालकांच्या बँक खात्याची तपासणी करणाऱ्या शाळांना खुलासा देण्यासाठी नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. शाळेचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळेवर कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. पालकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येईल.शिं
- ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, प्रथमिक शिक्षण, पिंपरी-चिंचवड महापालिका