दोन हजार बेशिस्त वाहनचालकांना नोटिसा
By admin | Published: October 7, 2016 04:07 AM2016-10-07T04:07:21+5:302016-10-07T04:07:21+5:30
वाहतूक सुरक्षित होण्यासाठी आणि वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना शिस्त लागण्यासाठी वाहतूक विभागातर्फे मागील आठवड्यापासून घरपोच नोटीस पाठविण्याची प्रक्रिया
पिंपरी : वाहतूक सुरक्षित होण्यासाठी आणि वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांना शिस्त लागण्यासाठी वाहतूक विभागातर्फे मागील आठवड्यापासून घरपोच नोटीस पाठविण्याची प्रक्रिया सुुरु झाली आहे. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दोन हजार बेशिस्त वाहनचालकांना कारवाईच्या नोटिसा पाठविण्यात आल्या असून, आठवडाभराच्या आत दंडाची रक्कम भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शहरातील प्रत्येक चौकांमध्ये वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त चालकांवर कारवाई सुरूच असते. मात्र, ज्या वेळी पोलीस नसतात आणि पोलीस असतानादेखील पोलिसांना गुंगारा देऊन पळून जातात. अशा बेशिस्त चालकांवर सीसीटीव्हीची करडी नजर असून, वाहतूक विभागातर्फे घरपोच दंडात्मक कारवाईच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत. सिग्नल तोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी थांबविणे, भरधाव वेगात गाडी चालवणे, मोबाइलवर बोलणे, सीटबेल्ट न लावणे अशा प्रकारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन घरपोच आंतरदेशीय पत्राद्वारे दंडाच्या नोटिसा पाठविण्यात येत आहेत.
मागील महिन्यातील २० सप्टेंबरपासून कारवाईची ही प्रक्रिया सुरू झाली असून, गेल्या पंधरा दिवसांमध्ये पुणे व पिंपरी-चिंचवडसह सुमारे २ हजार ३३ वाहनधारकांना कारवाईच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. वाहनधारकाला जवळच्या वाहतूक विभागाच्या कार्यालयात सात दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरण्याची सक्ती करण्यात आली आहे. जे वाहनधारक वेळेत दंडाची रक्कम भरणार नाहीत, त्यांच्या विरोधात मोटार वाहन कायद्यानुसार न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे.
शहरातील विविध चौकांत वाहतूक विभागाने उच्चतम दर्जाची सीसीटीव्ही यंत्रणा बसविली आहे. ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली आहे. चौकात वाहतूक पोलीस अथवा वॉर्डन दिसत नाही, हे पाहून सिग्नल असतानाही पुढे जाणारे वाहनचालक, झेब्रा क्रॉसिंग करणारे वाहनचालक सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. नियमांचे उल्लंघन केले, मात्र आपणास पाहिले नाही, असा समज असणाऱ्या वाहनचालकांना घरपोच दंडाच्या नोटिसा मिळाल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.(प्रतिनिधी)
४दंडात्मक कारवाईमध्ये झेब्रा काँसिंगवर गाडी थांबवल्यास २०० रुपये, सिग्नल तोडणे २०० रुपये, सीटबेल्ट न लावणे व मोबाइलवर बोलणाऱ्यासही २०० रुपये दंडाची नोटीस पाठविण्यात येत आहे. अशा बेशिस्त चालकांवर कारवाईसाठी वाहतूक विभागातर्फे पुणे व पिंपरी-चिंचवडसह एकूण १ हजार २३६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. नियम मोडणाऱ्या त्या संबंधित वाहनाच्या क्रमांकावरून वाहनमालकाचा पत्ता शोधून दंडाच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत.