इच्छुकांकडून आता ‘होऊ द्या खर्च’
By Admin | Published: January 25, 2017 02:01 AM2017-01-25T02:01:32+5:302017-01-25T02:01:32+5:30
महापालिका निवडणूक अवघ्या महिन्यावर येऊन ठेपली असून सर्व भागातील राजकीय मंडळींकडून आपआपल्या भागातील कार्यकर्त्यांचे
मोशी : महापालिका निवडणूक अवघ्या महिन्यावर येऊन ठेपली असून सर्व भागातील राजकीय मंडळींकडून आपआपल्या भागातील कार्यकर्त्यांचे वाढदिवस दिमाखात साजरे केले जात आहेत. तसेच मतदाराला खूश करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचाही नजराणा दिला जात आहे. त्यामुळे अशा शक्तिप्रदर्शनासाठी इच्छुकांकडून होऊ द्या खर्च असे म्हटले जात आहे.
मतदार राजापर्यंत पोहोचण्यासाठी, त्याला खूश करण्यासाठी शहरात सध्या लहान कार्यक्रमांपासून ते भव्य-दिव्य कार्यक्रमांचा धडाका सुरू आहे. त्यासाठी सिने-नाट्य क्षेत्रातील कलावंतांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून घेतला जात आहे. ‘चला हवा येऊ द्या’ टीममधील भाऊ, कुशल, भारत, सागर, श्रेया ही टीम असो, की ‘होम मिनिस्टर’वाले आदेश भावोजी यांना सर्वाधिक मागणी आहे. याशिवाय, खर्चिक बालमेळावे, संगीत रजनी, विविध कला-क्रीडा स्पर्धांचे आयोजन, वाढदिवसाच्या नावाखाली जेवणावळी, थर्टी फर्स्टप्रमाणे ओल्या पार्ट्या असे एक ना अनेक उपद्व्याप इच्छुक उमेदवारांकडून सुरू आहेत. त्यासाठी लाखो-करोडो रुपयांची उधळपट्टी सुरू आहे. राजकीय पक्षांच्या मुलाखती, मेळावे, आंदोलने, नेत्यांची बडदास्त असे विविध कार्यक्रम सुरू आहेत, त्यासाठी खर्च होतोच आहे. चलनातील जुन्या नोटा वापरता येत नाहीत. नव्या नोटा मिळत नाहीत. (वार्ताहर)