आता आश्वासनांचे राजकारण संपले
By admin | Published: February 14, 2017 02:02 AM2017-02-14T02:02:31+5:302017-02-14T02:02:31+5:30
मागील पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांना सत्ताधाऱ्यांनी अनेक आश्वासने दिली. मात्र त्याचे काय झाले, यावर बोलणार नाही. मतदारराजा सुजाण
भोसरी : मागील पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांना सत्ताधाऱ्यांनी अनेक आश्वासने दिली. मात्र त्याचे काय झाले, यावर बोलणार नाही. मतदारराजा सुजाण झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आश्वासनांवर मतदान होणार नाही, तर योग्य उमेदवारालाच मतदान होईल, असा विश्वास भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक तीनमधील भाजपाचे उमेदवार नितीन अप्पा काळजे, सुवर्णा विकास बुर्डे, लक्ष्मण सोपान सस्ते यांच्या प्रचारासाठी आमदार लांडगे यांच्या उपस्थितीत डुडुळगाव येथील अडभंगनाथ मंदिरासमोर सभा झाली. या वेळी आमदार लांडगे बोलत होते. डुडुळगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले, ‘‘विधानसभेच्या निवडणुकीत डुडुळगावातील गावकऱ्यांनी पाठिंबा दिला होता. मला ८४ टक्के मतदान झाले होते. अपक्ष असताना मला याच गावकऱ्यांनी साथ दिली आहे. आता भाजपाच्या माध्यमातून भोसरी मतदारसंघात चांगले काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये आपल्या विचारांचेच नगरसेवक निवडून यावेत. नागरिकांना अडचणीतून बाहेर काढतील अशाच उमेदवारांची निवड केली आहे. आपली साथ हवी. ग्रामस्थांना वाटते की, माझे डुडुळगावाकडे लक्ष नाही.
मात्र २०१४ नंतर माझे सर्वांत जास्त लक्ष या गावांकडेच आहे. या गावाचा विकास करण्यासाठीच सक्षम आणि आपल्या विचारांच्या उमेदवारांना उभे केले आहे. आपल्या गावाच्या विकासासाठी नक्कीच या उमेदवारांना ग्रामस्थ साथ देतील. मागील पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवक नितीन काळजे यांनी चऱ्होलीचा मोठ्या प्रमाणात
विकास केला आहे. त्याचप्रमाणे या निवडणुकीत प्रभाग क्रमांक
तीनमध्ये जोडलेल्या गावांचा विकास करण्याची संधी या उमेदवारांना द्यावी.’’(वार्ताहर)